पिंपरी – जागेच्या व्यवहारात 99 लाख 35 हजार रुपये घेऊनही खरेदीखत न करता कॉंग्रेसच्या माजी नगरसेवकाची फसवणूक केली. ही घटना पिंपरीतील खराळवाडी परिसरात घडली.
सद्गुरू महादेव कदम (वय 50, रा. खराळवाडी, पिंपरी) यांनी शुक्रवारी (दि. 22) याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अशोक रामेश्वर गोयल (वय 70) आणि समीर अशोक गोयल (वय 40, दोघेही रा. इंद्रायणीनगर, भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. ही घटना जानेवारी 2015 ते 21 एप्रिल 2022 या कालावधीत पिंपरी येथे घडली.
फिर्यादी कदम यांना खराळवाडी येथील सर्व्हे नंबर 156अ/6/1अ/1 ही जागा ही क्षेत्र 11 आर म्हणजेच 1100 चौरस मीटर इमारतीपैकी तिसऱ्या मजल्यावरील बांधकाम 283.96 चौरस मीटर व त्यावरील संपूर्ण टेरस विकत घेण्यासाठी 99 लाख 35 हजार रुपये आरोपी यांना दिले. त्यानुसार आरोपींनी नोटरी करारनामाही करून दिला. फिर्यादी हे उर्वरित 10 लाख 65 हजार रुपये देण्यास तयार असतानाही आरोपींनी खरेदीखत करून देण्यास टाळाटाळ करीत फिर्यादी कदम यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.