पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रानिक ओळखपत्र देण्यात येत आहे. त्यामुळे सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून “एक कॅम्पस एक आयकार्ड’ ही संकल्पना राबविण्यात आली आहे. त्यामुळे विद्यापीठात शिकणाऱ्या सुमारे सहा हजार विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या सर्व सुविधांचा, योजनांचा लाभ योग्य प्रकारे मिळणार आहे.
विद्यापीठाने विभागांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांना “आरएफआडी’ हे इलेक्ट्रॉनिक ओळखपत्र देण्यात आले आहे. त्याचा सध्या केवळ जयकर ग्रंथालयासाठी वापर केला जात आहे. अशाच प्रकारे आता विद्यापीठातील इतर सेवा इलोक्ट्रोनिक ओळखपत्रावर दिल्या जाणार आहेत, अशी माहिती कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी दिली. या संकल्पनेद्वारे बायोमेट्रिक हजेरी, कमवा शिका योजनेतील सहभाग, शिष्यवृत्ती, विद्यापीठात प्रवेश करताना गेटवरून होणारा प्रवेश यासह इतर सुविधांसाठी या “इ-ओळखपत्रा’चा वापर केला जाणार आहे. या एका ओळखपत्रासाठी 60 रुपये खर्च आला आहे. पुढील महिनाभरात ही सुविधा सुरू केली जाणार आहे.
विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी “इ-ओळखपत्र’ देण्यात आलेले आहे. सध्या जयकर ग्रंथालयात याचा वापर सुरू आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठातील सर्व सेवांशी आणि सुरक्षा यंत्रणेशी हे ओळखपत्र जोडले जाणार आहे. नवीन धोरणे ठरविण्यासाठी हे ओळखपत्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
– डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, पुणे विद्यापीठ