नाशिक – राज्य शासनाच्या कृषी विभागातील वरिष्ठ लिपिक पदाची ऑनलाइन (online exam)परीक्षा देताना एका उमेदवाराने सॅंडलमध्ये मोबाइल तसेच कॅमेरा व इतर डिव्हाइस बनियनमध्ये लपवून हायटेक कॉपी केल्याचा प्रयत्न उघड झाला आहे. जालना जिल्ह्यातील बदनापूरचा रहिवासी सूरज विठ्ठलसिंह जारवाल या संशयित उमेदवाराविरोधात म्हसरूळ पोलिस ठाण्यात या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे विद्यार्थी गृह कॉलेज येथे हा प्रकार उघडकीस आला. (agraiculture exam copy case)
याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती आणि ऋषिकेश कांगणे (रा. तळेगाव, ता. दिंडोरी) या उमेदवाराने दिलेल्या तक्रारीनुसार, परीक्षा हॉलमध्ये दुपारी परीक्षा सुरू असताना समोरील बाकावर बसलेला उमेदवार सॅंडलमधून मोबाइल आणि इतर इलेक्ट्रिकल डिव्हाइस काढून पेपरचे फोटो काढत असल्याचे निदर्शनास आले. ही बाब तत्काळ पर्यवेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून दिली. संबंधित अधिकाऱ्याने तत्काळ बंदोबस्तावरील पोलिस कर्मचाऱ्यांना बोलावून घेत संशयित उमेदवाराला ताब्यात दिले. त्याची अंगझडती आणि सॅंडलची तपासणी केली असता मोबाइल पॉकेटमध्ये छिद्र पाडून मायक्रो कॅमेरा लपवल्याचे आढळून आले. वरिष्ठ निरीक्षक राजू पाचोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणी तपास सुरू आहे. (copy case)
संशयित उमेदवाराने सॅंडल कापून त्यात मोबाइलसाठी जागा केली होती. सूक्ष्म कॅमेरा व डिव्हाइस लपवण्यासाठी सॅंडो बनियनला आतून पॉकेट आणि पॉकेटला सूक्ष्म छिद्र पाडून प्रश्नपत्रिकेचे फोटो काढून मोबाइलवर समोरील व्यक्तीला पाठवण्याचा प्रयत्न केला.
परीक्षा हॉलमध्ये एका उमेदवारानेच हा प्रकार पर्यवेक्षकाच्या लक्षात आणून दिला. पोलिसांनी संशयितास पकडल्यानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकाने त्याला थोड्याच अंतरावर ताब्यात घेतले. गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
– राजू पाचोरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, म्हसरुळ