आळंदी, – घरगुती सिलबंद गॅस सिलेंडरमधून छोट्या रिकाम्या 4 किलोच्या गॅस सिलेंडरमध्ये गॅस अवैधरित्या रिफील करून विक्री करणाऱ्यास पोलीसांनी अटक केली आहे. संदीप लांडगे (24) असे अटक केलेल्याचे नाव असून त्याच्याकडून 62 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास आळंदी पोलीस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी – मरकळ रोडवरील धानोरे फाटा येथील पत्र्याच्या शेडमध्ये संदीप लांडगे घरगुती गॅस सिलेंडरमधून छोट्या 4 किलोच्या गॅस सिलेंडरमध्ये गॅस अवैधरित्या रिफील करून विक्री करत असल्याची माहिती पोलीस हवालदार प्रदीप गोडांबे यांना मिळाली होती. त्यानुसार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे खंडणी विरोधी पथकाने छापा टाकून मुद्देमालासह गोडांबे याला अटक केली आहे.
यावेळी 8 घरगुती वापराचे सिलेंडर, 1 व्यावसायिक सिलेंडर, 13 लहान गॅस भरलेले सिलेंडर, 37 रिकामे लहान सिलेंडर, 5 पितळी रीफीलर नोजल, 2 गॅस रिफिलिंग सर्किट असा एकूण 62 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी भा.दं.वि. कलम 420, 285, 286, सह जीवनावश्यक वस्तुचा कायदा 1955 चे कलम 3,7 सह स्फोटक पदार्थ अधिनियम सन 1908 चे कलम 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कार्यवाही आळंदी पोलीस करत आहेत.
ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त डाॅ. संजय शिंदे, अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, उप-आयुक्त गुन्हे स्वप्ना गोरे, सहा. पोलिस आयुक्त गुन्हे सतिश माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार, सहा. पोलिस निरीक्षक उद्धव खाडे, खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार प्रदीप गोडांबे, आशिष बोटके, किरण काटकर यांच्या पथकाने केली आहे.