नगर – जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदार संघात 35 लाख 67 हजार 817 मतदार असून त्यापैकी 80 वर्षाहून अधिक वय असलेल्या मतदारांची संख्या 1 लाख 40 हजार 402 इतकी आहे. या सर्व मतदारांचे सर्वेक्षण जिल्हा निवडणूक विभागामार्फत करण्यात आले आहे.
मतदार यादीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेने तालुका निवडणूक विभाग आणि विधानसभानिहाय मतदार याद्या तपासण्याचे काम हाती घेतले आहे. एक वर्षानंतर राज्यात प्रथम लोकसभा व नंतर विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदार याद्या अद्ययावत करण्यात येत आहेत.
दिलेल्या पत्त्यावर मतदार आढळून न आल्यास किंवा त्यांचा मृत्यू झाल्यास त्यांची नावे यादीतून वगळली जाणार आहेत. जानेवारी 2023 मध्ये प्रसिद्ध यादीतील 80 वर्षांवरील मतदारांच्या पडताळणीबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील 80 वर्षांहून अधिक वय असणाऱ्या 1 लाख 40 हजार 402 मतदारांचे निवडणूक कर्मचाऱ्यांतर्फे सर्वेक्षण करण्यात आले आहेत. ज्या मतदारांचे वय मतदार यादीमध्ये चुकीने त्यांचे मूळ वयापेक्षा जास्त टाकण्यात आले आहे, अशांच्या वयाची दुरुस्ती करण्यात येत आहे.
जिल्ह्यात 35 लाख 67 हजार 817 मतदार आहेत. त्यापैकी 18 लाख 56 हजार 564 पुरुष मतदार आहेत तर 17 लाख 11 हजार 85 महिला मतदार, 168 इतर मतदार आहेत. तसेच अस्पष्ट छायाचित्र असलेल्यांचे रेकॉर्ड शोधण्याचे काम सध्या सुरु आहे.
अस्पष्ट छायाचित्र असलेल्यांचे रेकॉर्ड शोधणार
मतदार यादीतील अस्पष्ट छायाचित्र असलेल्या 90 हजार 412 मतदारांचे रेकॉर्ड शोधून योग्य छायाचित्र गोळा करून तसेच त्यांच्या नावाच्या नोंदीमध्ये इतर चुका नसल्याची खात्री करून मतदाराकडून नमुना क्र. 8 भरून घेण्यात येत आहे. तसेच आपले नाव यादीत असल्याबाबत मतदारांनी खात्री करावी. ज्यांची नावे यादीत नसतील त्यांनी नव्याने नोंदणी करावी. असे निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.