शिरवळ (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड येथील पोलीस कर्मचारी व मूळ पळशी, ता. खंडाळा येथील रहिवासी असलेल्या युवकाला करोनाची लागण झाल्याचे गेल्या आठवड्यात गुरुवारी (दि. 21) स्पष्ट झाले होते. त्याच्या कुटुंबातील सात जणांना शिरवळ येथे विलगीकरण कक्षात दाखल केले होते. त्या युवकाची पत्नी, आई व दहा वर्षांचा मुलगा करोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल काल शनिवारी (दि. 23) रात्री आल्याने गाव हादरले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या 28 कुटुंबांमधील दीडशे जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. पारगाव येथील बाधित रुग्णाच्या नऊ निकट सहवासीतांना शिरवळ येथे संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.तालुक्यात करोनाबाधितांचा आकडा 14 झाल्याने चिंतेचे वातावरण आहे.
पळशीतील हा युवक दि. 16 रोजी पिंपरी-चिंचवडला गेला. त्या आधी तो तीन दिवस तो पळशीत राहिला होता. तीन दिवसात त्याचा गावातील अनेकांशी संपर्क आला होता. तो पुण्याला गेल्यानंतर त्याला त्रास जाणवू लागला. उपचारादरम्यान त्याची करोना चाचणी करण्यात आली असता, दि. 21 रोजी त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.
त्यानंतर त्याची आई, पत्नी व मुलगा करोनाबाधित झाल्याने पळशीकरांच्या पायाखालची जमीनच सरकल्यासारखी स्थिती झाली. ग्राम दक्षता समितीचे सदस्य व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील यांनी तातडीने ध्वनिक्षेपकाद्वारे ग्रामस्थांना याची माहिती देऊन सर्व व्यवहार बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या. गावातील सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश पाटील यांनी संपूर्ण गावात सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या.