खटाव (प्रतिनिधी) – खातगुण (ता. खटाव) येथील एका व्यक्तीला करोनाची बाधा झाल्याची चुकीची माहिती संबंधित विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आल्याने खटाव तालुक्यातील प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. दरम्यान, करोना बाधित व्यक्ती ही खातगुणमधील नसून सातारा तालुक्यातील खडगाव येथील असल्याचे नंतर सांगण्यात आले.
शनिवारी जिल्ह्यात 24 तासात जिल्ह्यात 77 संशयितांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले. यामध्ये खटाव तालुक्यातील खातगुण येथील एका व्यक्तीला करोनाची बाधा झाल्याची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आल्याने खटाव तालुक्यातील तसेच खातगूण येथील स्थानिक प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. प्रशासनाकडून गावातील प्रत्येक घर पिंजून काढल्यानंतर गावात कोणीही करोनाबाधित आढळून आला नाही. त्यानंतर याबाबत अधिक चौकशी केली असता. सातारा तालुक्यातील परळी विभागातील खडगाव येथील व्यक्तीला करोनाची लागून झाली असून खडगावच्या ऐवजी चुकून खातगूण असे नमूद करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यात सध्या करोनाचा कहर सुरु आहे. शनिवारी दिवसभरात तब्बल 77 जणांचे अहवाल हे करोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे संपूर्ण जिल्हाच हादरुन गेला. या 77 करोनाबाधितांमध्ये विविध तालुक्यांमधील रुग्णांचा समावेश आहे. या रुग्णांपैकी सातारा तालुक्यातील परळी विभागातील खडगाव येथे मुंबईवरुन आलेल्या एका 20 वर्षील महिलेचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला. मात्र संबंधित विभागाकडून या महिलेली नोंद ही खडगाव नव्हे तर खातगुण (ता. खटाव) अशी करण्यात आली. त्यामुळे खातगुण येथे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.
पोलीस प्रशासन, तालुका प्रशासन, आरोग्य विभाग, आपत्ती कृती समिती तसेच खातगुणचे सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांनी रात्री उशिरापर्यंत घर टू घर कसून चौकशी केली. मात्र संपूर्ण खातगुण गावात कोणीही मुंबईवरुन आलेल्या व्यक्तीला करोना झाला नसल्याचे आढळून आले. त्यानंतर संबंधित विभागाकडे चौकशी केली असता. माहिती नमूद करताना खडगाव च्या रुग्णाचा पत्ता हा खातगुण सांगितला गेल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, खातगुण येथे कोणालाही करोनाची बाधा झालेली नाही. त्यामुळे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन येथील सरपंच अनिल साठे, ग्रामसेवक आर. जे. जाधव, पोलीस पाटील संगीता फडतरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.