नवी दिल्ली – भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर मध्य दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या मुख्यालयात हेरगिरी केली जात असल्याचा आरोप या पक्षाने केला आहे. त्या संबंधात आपच्या मुख्यालयात हेरगिरीसाठी आलेल्या सात अज्ञात इसमांचे सीसीटीव्ही फुटेजही आम आदमी पक्षातर्फे पुरावा म्हणून पत्रकारांपुढे सादर केले गेले आहे. आपचे मुख्य प्रवक्ते आणि दिल्लीचे कॅबिनेट मंत्री सौरभ भारद्वाज यांनी पत्रकारांना ही माहिती देताना हे फूटेज सादर केले.
भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या राष्ट्रीय पक्षाच्या राष्ट्रीय मुख्यालयाची हेरगिरी केली जात आहे. आप मुख्यालयात सात हेर पाठवून राष्ट्रीय पक्षाची हेरगिरी करण्यात आली. हे लोक कोणत्या तरी सरकारी संस्थेशी संबंधित असल्याचे दिसते. केंद्र सरकार अरविंद केजरीवालांना इतके का घाबरते असा सवालही भारद्वाज यांनी केला आहे. ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाचीही हेरगिरी करण्यात आली होती. ही अत्यंत गंभीर बाब आहे,असे भारद्वाज म्हणाले.
आतापर्यंत फक्त व्यक्तींचीच हेरगिरी केली जायची, पण आता भारतातील एका राष्ट्रीय पक्षाच्या राष्ट्रीय कार्यालयाची हेरगिरी केली जात आहे. देशाची राजधानी दिल्लीत निवडून आलेल्या सरकारच्या पक्षाचे राष्ट्रीय मुख्यालय केंद्र सरकारकडून हेरले जात असताना, या देशातील केंद्र सरकारवर विश्वास कसा ठेवायचा?” असा सवाल भारद्वाज यांनी केला. या प्रकाराच्या मागचे कारण फक्त केंद्र सरकारच सांगू शकते. असे ते म्हणाले.