मंचर- आंबेगाव तालुक्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या 284 वर पोहोचली आहे. 201 रुग्ण बरे झाले असुन 78 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी दिली. मंचर 2, कुरवंडी 1, अवसरी खुर्द 1, चास 1, पारगाव 1, शिनोली 1 असे एकूण 7 रुग्ण शनिवारी (दि.1) करोनाबाधित आढळले आहेत.
करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना होमक्वारंटाइन करण्यात आले आहे. नागरिकांनी महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये. बाहेर पडताना मास्कचा वापर करावा. अन्यथा पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा मंचरचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी दिला आहे.