प्रवीण माने : सोनाई कृषी प्रक्रिया कारखान्यात रोलर पूजन
रेडा- सोनाई परिवाराचे संस्थापक दशरथ माने यांच्या मार्गदर्शनाखाली सोनाई कारखान्याचा 14 व्या गाळप हंगामात कारखान्याने दीड लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी आवश्यक ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा सज्ज ठेवल्याची माहिती जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे माजी सभापती, सदस्य प्रवीण माने यांनी दिली.
वरकुटे (ता. इंदापूर) येथील सोनाई कृषी प्रक्रिया कारखान्यात रोलरचे पूजन माने यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अभिमान करे, योगेश देवकर,कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे. एस. भुंजकर, मुख्य अभियंता सुभाष काळे, उमेश ननवरे, रामहरी माने, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
शेतकरी बांधवांना योग्य तो हमीभाव देण्यासाठीची सोनाई कृषी प्रक्रिया कारखान्याची परंपरा आहे, त्यात अजिबात खंड पडणार नाही, हा विश्वास माने यांनी शेतकऱ्यांना दिला. यावर्षी उसाचे उत्पन्न जास्त प्रमाणात झाल्याने गाळप हंगामासाठी कारखान्यात युद्धपातळीवर कामे सुरू आहेत. सर्व विभागाची कामे सुरू करण्याच्या दृष्टीने काम प्रगतीपथावर आहे. लवकरच हंगामास सुरूवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले.