वडूज – करोनामुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे अत्यावश्यक सेवा वगळत सर्व व्यवसाय, उद्योगधंदे बंद आहे. मात्र सध्या सुरु असलेले लॉकडाऊन हे चोरट्यांच्या चांगलेच पथ्थ्यावर पडले आहे. खटाव तालुक्यातील वडूजमधील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह, किराणा माल, भांडी व दुचाकी वाहनांतील पेट्रोलची चोऱ्या केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.
परिसरात गेल्या महिनाभरापासून चोरट्यांनी कमालीचा उच्छाद मांडला आहे.
गेल्या आठवडाभराच्या काळात चोरट्यांचा हा उच्छाद काहीसा कमी होतो न् होतो तोच चोरट्यांनी पुन्हा आपले डोके वर काढले आहे. करोनामुळे अवघे जनजीवन ठप्प झाले आहे. तर परगावी गेलेले काही नागरिक लॉकडाऊनमुळे त्याच ठिकाणी अडकले आहेत. त्यामुळे या नागरिकांची घरे बंद आहेत. नेमकी अशी बंद घरेच आता चोरट्यांनी लक्ष्य केली आहेत. बंद घरे फोडून घरांतील सोन्या चांदीच्या दागिन्यांसह तांदूळ, साखर, विविध प्रकारच्या डाळी, चहा पावडर अशा किराणा मालासह घरांतील दूरचित्रवाणी संच, पितळेची भांडी यावर हात साफ करीत आहेत. याशिवाय दुचाकी वाहनांतील पेट्रोलचीही चोरी केली जात आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वी येथील कुमठे फाट्यावरील नवतेजनगर परिसरात राहणाऱ्या अमृत नामदेव थोरवे यांच्या बंद घरात चोरट्यांनी डल्ला मारला. श्री. थोरवे हे नाशिकला गेले होते. लॉकडाऊन झाल्यामुळे ते त्याठिकाणी अडकून पडले आहेत. त्यामुळे त्यांचे घर बंदच होते. चोरट्यांनी नेमक्या याच संधीचा फायदा घेऊन नजिकच्या घराला बाहेरून कड्या लावून थोरवे यांच्या बंद घराचे दार उचकटून आतमध्ये प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाट उचकटून त्यामधील कर्णफुले आदी सुमारे दीड ते दोन तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केले.
चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांबरोबरच घरातील तांदूळ, साखर, शेंगदाणे, चहा पावडर, विविध प्रकारच्या डाळी आदी किराणा मालही लांबविला. याशिवाय घरातील दूरचित्रवाणी संच, बॅटरी, स्पिकर संच आदी इलेक्ट्रीक साहित्याचीही चोरी केली. घरात कोणीच नसल्याने चोरट्यांनी घरातील सर्व साहित्याची मोठी उलथापालथ केली होती. याबाबत थोरवे यांच्या नातेवाईक सारीका दत्तात्रय गोडसे यांनी फिर्याद दिली आहे.
याशिवाय चोरट्यांनी नागमळा येथील प्रभाकर गोडसे यांच्या घरानजिकच्या दहा ते बारा दुचाकी वाहनांतील पेट्रोलही गायब केले. इंधनाच्या टाकीतून येणारी पेट्रोलची पाईपच कट करून चोरट्यांनी दुचाकी वाहनांचे पेट्रोल चोरले. रविंद्र गोडसे यांच्या वखारीतही चोरट्यांनी प्रवेश करून तेथील कपाटाची मोडतोड करीत आतमधील काही साहित्य लांबविले.
चप्पलचीही चोरी
प्रभाकर गोडसे यांच्या घरानजिकच्या एका दुमजली इमारतीमध्ये चोरट्यांनी प्रवेश करून त्याठिकाणी चोरीचा प्रयत्न केला. मात्र त्याठिकाणी काहीच हाताशी न लागल्याने चोरट्यांनी जाता जाता तेथील एक नवी कोरी चप्पलही चोरल्याचे नागरिकांनी सांगितले.