सातारा – सातारा शहरातील महिला आरोग्य कर्मचारी आणि कराडमधील करोनाबाधित रुग्णाच्या सहवासातील 11 वर्षांचा मुलगा अशा दोघांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या आता 43 झाली आहे. कृष्णा रुग्णालयातील तीन बाधितांच्या 14 दिवसांनंतरच्या दोन चाचण्या निगेटिव्ह आल्याने ते करोनामुक्त झाले आहेत. ही दिलासा देणारी घटना असली तरी करोनाचा आणखी एकरुग्ण मिळाल्याने कराडमधील चिंता कमी झालेली नाही. तर सातारा शहरात करोनाचा शिरकाव झाल्याने सातारा शहराला टेन्शन आले आहे.
साताऱ्यातील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयातील 36 वर्षीय महिला आरोग्य कर्मचारी व कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील बाधित रुग्णाच्या निकट सहवासातील 11 वर्षाचा मुलगा असे एकूण दोन जणांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह (कोविड-19) आला असल्याचे पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. सातारा जिल्ह्यात 43 करोनाबाधित रुग्ण बाधित असून त्यापैकी आतापर्यंत 8 रुग्ण करोनामुक्त होऊन त्यांना रुग्णालयातून सोडले आहे तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल असणाऱ्या तीन करोनाबाधित रुग्णांचे 14 दिवसानंतरचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना बुधवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील 20, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील 33, कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 6, फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील 1 व वाईच्या ग्रामीण रुग्णालयातील 1 अशा एकूण 61 संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे. बुधवारी दि. 29 एप्रिल रोजी क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात 48, कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात 18, कोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयात 11 अशा एकूण 77 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली.