नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल घेतली. काही दिवसांपुर्वीच ममता बॅनर्जी यांना न भेटता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले होते, तो संदर्भ देत दिल्लीच्या आणि राज्याच्या राजकीय वतुर्ळात राजकीय अफवांचे पतंग उडाले.
या भेटीसंदर्भात शरद पवार यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सुनील तटकरे उपस्थित होते. सर्वप्रथम मी अमित शाह यांचं देशाचे पहिले सहकार मंत्री म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन केले.
या भेटीदरम्यान, आम्ही देशातील साखर उद्योगाची परिस्थिती आणि साखरेच्या अतिरिक्त उत्पादनामुळे निर्माण होणाऱ्या समस्या यावर चर्चा केली. आम्ही साखर उद्योगाशी संबंधित दोन महत्त्वाच्या मुद्द्यांकडे अमित शाह यांचे लक्ष वेधले.
दरम्यान, या भेटीवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सावधपणे प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘अमित शाह हे सहकार खात्याचे मंत्री आहेत. त्यादृष्टीने शरद पवार यांनी शाहा यांची भेट घेतल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले,’केंद्र सरकारने पूरग्रस्तांना तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणीही केली. अमित शाह राष्ट्रीय आपत्ती निवारणासंबंधीचे निकष बदलण्याचे काम करतील, अशी आशा आम्हाला आहे.’असे राऊत यांनी म्हटले.