पुणे – कलिंगडाच्या पिकाला दुष्काळाचा फटका

नेहमीच्या तुलनेत 70 टक्‍केच आवक : मागणी असल्याने भावही जास्त

पुणे – कलिंगडाच्या पिकाला दुष्काळाचा फटका बसला आहे. पाण्याअभावी उत्पादन कमी झाल्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत सुमारे 30 टक्‍के मार्केटयार्डातील फळबाजारात कमी आवक होत आहे. त्या तुलनेत मागणी जास्त असल्याने कलिंगडाचे भाव 20 ते 30 टक्‍क्‍यांनी वाढले असल्याची माहिती व्यापारी पांडुरंग सुपेकर यांनी दिली.

येथील बाजारात सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, करमाळा, बार्शी तसेच नगर जिल्ह्यातील कर्जत, जामखेड, राशीन येथून मिळून दररोज सुमारे 80 टन कलिंगडाची आवक होत आहे. सध्या बाजारात प्रतवारीनुसार कलिंगडाच्या प्रतिकिलोस 8 ते 13 रुपये भाव मिळत आहे. गेल्यावर्षी 8 ते 10 रुपये प्रतिकिलो भावाने कलिंगडाची विक्री होत होती.

दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात कलिंगडाला मोठी मागणी राहाते. सध्या लग्नसराईमुळे ज्युस, फ्रुट डिशसाठी केटरर्सकडून तसेच किरकोळ विक्रेत्यांकडून कलिंगडाला चांगली मागणी आहे. मे महिन्यात रमजानच्या उपवासास सुरवात होत असल्याने मागणी वाढून त्याचे भाव आणखी वाढण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, उष्णता वाढल्यास कलिंगडच्या पिकाला धोका निर्माण होण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही. त्यामुळे, येत्या काळात कलिंगडाचे भाव चढेच राहातील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. बाजारातील कलिंगडला पुण्यासह गोवा, मुंबई, दिल्ली येथून मागणी होत आहे.

दुष्काळाचा मोठा परिणाम कलिंगडाच्या पिकावर झाला आहे. प्रतही थोडीशी घसरली आहे. मात्र, यावर्षी मालाला चांगली मागणी आहे. भावही चांगला मिळत आहे. मात्र, अपेक्षित उत्पादन न झाल्याने फारसा फायदा झालेला नाही.
– संजय शिंदे, शेतकरी, रा. कान्हापुरी, ता. पंढरपुर

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.