#IPL2019 : कोलकातावर राजस्थानचा ‘रॉयल’ विजय

कोलकाता -राजस्थान रॉयल्सने उत्कृष्ट गोलंदाजीनंतर केलेल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सचा 3 विकेटस्‌नी पराभव केला. 176 धावांचे आव्हान 19.2 षटकांत 7 बाद 177 धावा करून विजय नोंदवित स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवले आहे. तत्पूर्वी दिनेश कार्तिक याने केलेल्या नाबाद 97 धावांच्या खेळीने कोलकाताने 20 षटकांत 6 बाद 175 धावांपर्यंत मजल मारली.

आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर अजिंक्‍य रहाणे आणि संजू सॅमसन यांनी आक्रमक सुरुवात करत 53 धावांची सलामी दिली. अजिंक्‍य रहाणे 34 धावांवर नारायणच्या गोलंदाजीवर पायचित झाला. त्यानंतर स्टिव्ह स्मिथ (2), बेन स्टोक्‍स (11) आणि स्टुअर्ट बिन्नी (11) हे एका पाठोपाठ बाद झाले.

त्यानंतर रियान प्रयाग आणि जोफ्रा आर्चर यांनी सातव्या विकेटसाठी 44 धावांची भागीदारी करत संघाला विजयासमिप नेले. रियान प्रयागने 31 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकार खेचत 47 धावांची खेळी केली. त्यानंतर आर्चरने षटकार ठोकत विजयावर शिक्‍कामोर्तब केला.

तत्पूर्वी, राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून कोलकाताला प्रथम फलंदाजीस निमंत्रण दिले. सामन्यातील तिसऱ्याच चेंडूवर वरुण एरॉन याने क्रिस लिनचा त्रिफळा उडवित शुन्यावर बाद केले. त्यानंतर पाचव्या षटकात शुबमन गिलचा त्रिफळा उडवित कोलकाताला दुसरा झटका दिला. त्यानंतर गोपाळने नितेश राणाचा अडसर दूर केला. आठव्या षटकात राणाला आर्चरकरवी झेलबाद केले.

मात्र दुसऱ्या बाजूने कर्णधार दिनेश कार्तिकने राजस्थानच्या गोलंदाजीचा नेटाने समाचार करत अर्धशतक पूर्ण केले. अखेरच्या षटकांत दिनेशने हल्लाबोल करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. राजस्थानकडून वरुण एरॉन याने दोन, तर थॉमस, गोपाळ आणि उनाडकट यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.