नवी दिल्ली – करोना व्हायरसच्या ओमायक्रॉन प्रकारामुळे काही प्रमाणात अस्थिरता निर्माण झाली असली तरी त्याचा भारतातील बांधकाम क्षेत्रावर अजिबात परिणाम झालेला नाही. घरांची विक्री वाढत आहे आणि आगामी काळातही ती वाढत राहण्याची शक्यता आहे असे विकासकांची संघटना असलेल्या क्रेडाई या संस्थेने म्हटले आहे.
क्रेडाईने या संदर्भात जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कर्जावरील व्याजाचे दर कमी आहेत. त्याचबरोबर विकासकांनी घरांचे दर कमी ठेवले आहेत. त्यामुळे दिवाळी -दसऱ्याच्या काळामध्ये बऱ्याच घरांची विक्री झाली आहे. आताही हे व्याजदर कमी आहेत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये ग्राहक घरांची खरेदी चालूच ठेवतील असे वातावरण आहे.
देशात आतापर्यंत 25 इतके ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. मात्र गंभीर परिस्थिती निर्माण होणार नाही असे दिसून येत आहे. त्यामुळे विकासकांच्या बांधकामावर कसलाही परिणाम झालेला नाही. विकासक ग्राहकांना ठरवलेल्या वेळेत घरे देऊ शकतील अशी आशा या संघटनेने व्यक्त केली आहे.
क्रेडाईचे अध्यक्ष हर्षवर्धन पटोडिया यांनी सांगितले की, या अगोदरच्या लॉक डाऊनमध्ये विकसकांनी परिस्थितीचा कसा सामना करायचा याचा धडा घेतला आहे. त्यामुळे आगामी काळात अशी परिस्थिती निर्माण झाली तर पुरवठासाखळी आणि कामगाराची उपलब्धता कशी हाताळावी यासंदर्भात विकसकांना अंदाज आलेला आहे. मात्र दरम्यानच्या काळामध्ये परिस्थिती फारशी गंभीर झाली असल्याचे दिसून येत नाही. जर ओमायक्रॉनमुळे परिस्थिती बिघडली तर लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर यातून रिअल इस्टेट क्षेत्राला वगळण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. क्रेडाईमध्ये तब्बल 13 हजार विकासक आहेत. या विकासकांनी कामगारांच्या आरोग्याची काळजी घेत काम सुरू करावे. त्याचबरोबर जास्तीत जास्त डिजिटायझेशनचा वापर करावा असे त्यांनी सांगितले.