चंदीगड – करोनामुळे जपानमधील टोकियो ऑलिम्पिक जरी एक वर्षाने पुढे ढकलण्यात आले आहे. ही स्पर्धा होणार का याबाबतचे कवित्व अद्याप संपलेले नाही. मात्र, ही स्पर्धा होण्याची मला खात्री असून नेमबाजीत पदक मिळविण्याचा मला विश्वास आहे व त्यासाठी मी सज्ज असल्याचे देशाची अव्वल नेमबाज मनू भाकर हिने सांगितले आहे.
देशात करोनाचे संकट अद्याप कायम असून लॉकडाऊन देखील वाढविण्यात आला आहे. त्यामुळे मनू सध्या हरीयाणामधील तिच्या गोरिया या गावात आहे. तिने घरातच टार्गेट बसवून घेतले होते त्याचा तिला उपयोग होत आहे. अर्थात जे हॅण्ड ऑपरेटेड टार्गेट मशिन तिने बसवले होते त्यात बिघाड झाल्याने तिने अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक टार्गेट मशिन बसवले आहे. आता माझा सराव अत्यंत योग्य पद्धतीने होत आहे.
यंदा होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी मी तयारी करत होते. मात्र, ही स्पर्धाच एक वर्षाने पुढे गेल्याने थोडे वाईट वाटले होते. पण समोर येईल त्या परिस्थितीला सामोरे जावेच लागते. त्यामुळे मनाची तयारी केली व सकारात्मकतेने आता पुढील वर्षी होत असलेल्या ऑलिम्पिकसाठी पुन्हा जोरदार तयारी व सराव सुरु केला आहे. नवे मशिन असल्याने आता सरावात खंड पडत नाही, असेही मनूने सांगितले. विश्वकरंडक, युवा ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुल स्पर्धेत मनूने अव्वल कामगिरी करत पदक जिंकले होते. आता तशाच मेहनतीने ऑलिम्पिकचेही पदक जिंकण्याचे तिचे स्वप्न आहे.