नवी दिल्ली : भारतीय महिला कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी अनेक महिला कुस्तीपटू पुन्हा एकदा आंदोलनाला बसल्या आहेत. दरम्यान, आता कुस्तीपटूंना ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राचीही साथ मिळाली आहे. नीरज चोप्राने यासाठी एक ट्वीट करत कुस्तीपटूंना पाठिंबा दिला आहे.
नीरज चोप्राने ट्वीटमध्ये, “ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना लवकरात लवकर न्याय मिळायला हवा. आमच्या खेळाडूंना रस्त्यावर उतरून न्यायाची मागणी करताना पाहून मला वेदना होत आहेत. त्यांनी आमच्या महान राष्ट्राचं प्रतिनिधित्व करून आम्हाला अभिमान वाटावा यासाठी खूप चांगलं काम केलं आहे.” असे म्हटले आहे.
— Neeraj Chopra (@Neeraj_chopra1) April 28, 2023
तर पुढे नीरज चोप्राने आपल्या ट्वीटमध्ये,”एक राष्ट्र म्हणून प्रत्येक माणसाची अखंडता आणि प्रतिष्ठेचं रक्षण करण्याची जबाबदारी आमची आहे. जे घडत आहे ते कधीच घडू नये. हा एक संवेदनशील मुद्दा आहे आणि तो निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीनं हाताळला गेला पाहिजे. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीनं कार्यवाही करून न्याय मिळवून द्यावा.” अशी मागणी यावेळी केली आहे.
विनेश फोगाट काल खूपच भावूक झाल्याचे दिसून आली. भारतीय क्रिकेटपटू आणि इतर आघाडीचे खेळाडू कुस्तीपटूंच्या सुरू असलेल्या आंदोलनाबाबत मौन बाळगून आहेत, यावर तिनं प्रश्न उपस्थित केले. ‘ब्लॅक लाइव्ह्स मॅटर’ चळवळीचं उदाहरणही यावेळी विनेशनं दिलं. उदाहरण देताना ती म्हणाली की, आपल्या देशात महान खेळाडू नाहीत असं नाही. असे अनेक क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी अमेरिकेतील ब्लॅक लाइव्ह्स मॅटर चळवळीला पाठिंबा दर्शवला होता. आमची एवढीही लायकी नाही का? असा परखड सवाल यावेळी तिने केला होता.