बारामतीत महादेव जानकर यांची पत्रकारपरिषदेत माहिती
बारामती – महायुतीतून राष्ट्रीय समाज पक्षाला परभणीची जागा मिळण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सिंहाचा वाटा आहे, त्यामुळे त्यांचे सर्व उमेदवार निवडून आणणे ही माझी नैतिक जबाबदारी असून धनगर समाज सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी उभा राहील, असा विश्वास राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
महायुतीचे उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ महादेव जानकर बारामती दौर्यावर आले आहेत, यावेळी बारामतीमध्ये त्यांनी पत्रकारांशी सवाद साधला. ते म्हणाले की,2014 मध्ये बारामतीतून सुप्रिया सुळे यांना आपण कडवी झुंज दिली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार, अशी लढत असून बारामती लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाचे प्राबल्य आहे. आपण उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या बाजुने असल्याने धनगर समाज बांधव उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी व महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभा असल्याचे त्यांनी नमूद केले.
संविधान कोणीही बदलू शकत नाही
भारताचे संविधान कोणीही बदलू शकत नाही. हे विनाकारण बदनाम करण्याचे षड्यंत्र आहे. सर्वांनी अपप्रचारापासून सावध राहावे. तसेच इंडिया आघाडीचे नेते कोण कुठे आहे.त्यांनाच माहिती नाही उगाच काही बोलू नये असे त्यांनी नमूद केले.
केंद्रात देखील धनगर समाजाच्या सवलती लागू
भाजपचे नेते धनगर अरक्षणावर बोलत नाही यावर असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, भाजपचे सरकार असताना धनगर समाजाला घटनेत 22 सवलती फडणवीस यांनी दिल्या आहेत, केंद्रात देखील या सवलती लागू करणार आहे. काँग्रेसने 40 वर्षे शाहू-फुले-आंबेडकर यांचे नाव वापरले. धनगर समाजाला वंचित ठेवले, भाजपने एमलसी, मंत्रिपद, खासदारकी दिली तुम्ही कारखान्याचे उपाध्यक्षपदा शिवाय काय दिले, असा सवाल जानकर यांनी केला.