हक्काच्या घरकुलासाठी पंचायत समितीत खेटे घालूनही न्याय मिळेना
बारामती (प्रतिनिधी) – दुसऱ्याने बळकावलेल्या घरकुलाचा ताबा मिळावा यासाठी पंचायत समितीमध्ये हेलपाटे मारून कंटाळलेल्या ज्येष्ठाने गटविकास अधिकारी यांच्या दालनात विषप्राशन केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी (दि. 20) सायंकाळच्या सुमारास घडला. गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात घडलेल्या या प्रकारामुळे शहर व तालुक्यात एकच खळबळ उडाली.
अशोक फिलोमना दामले (वय 60, रा. पणदरे, ता. बारामती) या ज्येष्ठ व्यक्तीने विषप्राशन केले. त्यांना तातडीने सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबतची माहिती अशी की, दामले यांना पणदरे येथील गीतानगर परिसरातील चाळीमध्ये शासनाकडून घरकुल देण्यात आले होते. ते गावामध्ये राहत नसताना दुसऱ्याने हे घरकुल बळकावले होते. त्याविरोधात दामले यांचा लढा सुरू होता. याबाबत ते वारंवार पंचायत समितीत हेलपाटे मारत होते. पंचायत समितीकडून त्यांना पोलिसांकडे दाद मागण्याचा सल्ला दिला जात होता. त्या उद्विग्नतेतून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले. तर खोली क्रमांक 113 मध्ये राहण्यास ग्रामपंचायत प्रशासनाची कोणतीही हरकत नसल्याचे पत्र दामले यांना ग्रामपंचायतीने दिले आहे. मात्र ते पत्र स्वीकारण्यास दामले यांनी नकार दिला, असल्याची माहिती समजली आहे. दरम्यान, सिल्व्हर ज्युबली उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सदानंद काळे व त्यांच्या टीमने दामले यांच्यावर उपचार सुरू केले त्यांच्या पोटातील विष बाहेर काढले त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले.
अशोक दामले यांना यापूर्वीच न्याय देण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच तहसीलदार यांच्या उपस्थितीत त्यांच्या घरकुलप्रकरणी बैठकदेखील घेण्यात आली होती, त्यांचे घरकुलही त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. घरकुल बसवण्याच्या प्रकारातून काही त्रास होत असल्यास त्याबाबत लेखी तक्रार देण्याचा सल्लादेखील त्यांना दिला होता. ग्रामपंचायत तसेच पंचायत समिती स्तरावर त्यांच्या घरकुलाचा कोणताही प्रश्न प्रलंबित नव्हता, असे असताना देखील त्यांनी हे कृत्य का केले हे समजले नाही.
-प्रमोद काळे, गटविकास अधिकारी, बारामती पंचायत समिती