नगर -वयोवृद्ध वडिलांचा सांभाळ न करता त्यांना शिवीगाळ, मारहाण करीत घराबाहेर काढल्याचा प्रकार केडगाव उपनगरातील शाहूनगरमध्ये घडला आहे. या प्रकरणी वृद्धाने कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोन्ही मुलासह सुना अशा चौघा जणांवर माता पिता व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह कल्याण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केडगावच्या शाहूनगर भागात राहणारे एक 72 वर्षीय वृद्ध आजोबांनी याबाबत सोमवारी (दि.22) सायंकाळी फिर्याद दिली. ते वयोवृद्ध झाल्याने त्यांना सध्या काहीही काम धंदा करता येत नाही. त्यांना दोन मुले आहेत. दोघांचीही लग्ने झाली आहेत. या वृद्ध आजोबांना सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्या 2 मुलांवर आहे.
तरीही त्यांनी या वृद्ध आजोबांना 9 ऑगस्ट रोजी दुपारी शिवीगाळ, मारहाण करत घराबाहेर हाकलून दिले. तेव्हापासून आजोबा हे तेथून जवळच असलेल्या रेशन दुकानाशेजारी राहत आहेत. दरम्यान काही सजग नागरिकांनी या आजोबांना माता पिता व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह कल्याण अधिनियम 2007 चे कलम 24 ची माहिती देत या अन्यायाविरोधात पोलिसांकडे दाद मागण्यास सांगितले. त्यानुसार त्या आजोबांनी सोमवारी (दि. 22) सायंकाळी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी चौघाजणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.