मुकुंद भालेराव
नगर – सध्या उत्तर भारतातील काही राज्यात थैमान घालत असलेल्या लंपी स्कीन व्हायरस या आजाराने नगर जिल्ह्यात एन्ट्री घेतली आहे. अकोले तालुक्यात लंपी स्किन बाधित जनावरे आढळली आहे. पशुसंवर्धन विभागाने तातडीने या घटनेची दखल घेत संबंधित जनावरांवर उपचार सुरू केले आहेत. तसेच हा संसर्गजन्य आजार असल्याने पशुपालकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
लंपी स्किन व्हायरस हा आजार जनावरांना होतो. मात्र हा आजार संसर्गजन्य आहे. जनावरांच्या गोठ्यातील माशा, डासांमार्फत हा आजार पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे पशुसंवर्धन विभाग सतर्क आहे. अकोले तालुक्यातील संबंधित ठिकाणी विभागाच्या पथकाने भेट दिली. बाधित 9 जनावरांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले. या तपासणीचे अहवाल पॉजिटिव आले.
यामध्ये गायी आणि वासरांचा समावेश आहे. त्यानंतर या जनावरांवर उपचार सुरू करण्यात आले. त्यांना लसही देण्यात आली. या उपचारांनंतर यातील 8 जनावरे बरी झाली आहेत. अद्याप एका जनावरावर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन विभागाने दिली.
आजाराची लक्षणे
-या आजारात जनावरांच्या शरीराचे तापमान वाढते. बाधित जनावरे अन्न पाणी ग्रहण करत नाही. नाक वाहण्यास सुरुवात होते. तसेच त्याच्या शरीरावर फोड येतात. कमी रोग प्रतिकार शक्ती असणाऱ्या गायामध्ये हा आजार वेगाने पसरतो, अशी काही लक्षणे दिसतात.
उत्तर भारतात थैमान
– लंपी स्कीन या घातक उत्तर भारतातील अनेक राज्यात थैमान घातले आहे. हिमाचल प्रदेशातील 9 जिल्ह्यात या आजाराला महामारी घोषित केले आहे. तसेच राजस्थान, हरियाणा या राज्यातही अनेक जनावरे या आजाराने बाधित आहेत. विशेष म्हणजे, या राज्यात काही जनावरांचा मृत्यू सुद्धा झाला आहे.
संसर्गजन्य आजार, खबरदारीच्या सूचना
-लंपी स्किन डिसीज व्हायरस हा आजार संसर्गजन्य आहे. माशा, किटक, डास यांच्यामार्फत हा आजार अन्य जनावरांमध्ये पसरतो. त्यामुळे बाधित जनावरांच्या संपर्कात येऊ नये. जनावरांचा गोठा नेहमी स्वच्छ ठेवावा. जनावरांना कुठे बाहेर सोडू नये अशा सूचना पशुपालकांना देण्यात आल्या आहेत.
===================