जम्मू : लॉकडाऊनच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी जम्मूचे उपमहापौर, पूर्णिमा शर्मा तथा भाजपचे माजी आमदार राजेश गुप्ता तसेच सल्लागार संध्या गुप्ता यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यांच्यावर ३०० जण एकत्र केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
जम्मू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपमहापौर पूर्णिमा शर्मा, भाजपचे माजी आमदार राजेश गुप्ता आणि सल्लागार संध्या गुप्ता यांनी गरजू लोकांना रेशन वाटपाचे आयोजन केले होते. रेशन वाटप करीत असतानां सुमारे ३०० जण एकत्र आले होते. त्यामुळे त्यांच्या सोशल डिस्टेंसिग नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम १८८, ३५३, २६९, २७० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासात देशात ९५७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे तर, ६३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. देशात एकूण कोरोनाबाधितांची संख्या १४ हजार ७९२ वर पोहचली असून, २ हजार १५ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आज गुजरातमध्ये १७६ राजस्थान ४१, आंध्र प्रदेश ३१ कर्नाटक १२ महाराष्ट ४ आणि मेघालयात २ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे.