अहमदनगर , नोकरी, व्यवसाय तर सगळेजण करतात. पण त्या व्यतिरिक्त काय करता येईल, या विचाराने मी झपाटलेला होतो. मग सी.ए करीत असतानाच आपण मल्टीस्टेट अर्बन क्रेडिट सोसायटी काढावी, हा विचार जोर धरू लागला. त्यादृष्टीने अभ्यास केल्यावर आपल्याला हे सहज शक्य आहे. हा विश्वास दृढ झाला आणि त्यातूनच श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटीच्या मुहूर्तमेढ रोवली गेली. c शेवगाव येथे 27 जुलै 2004 ला पहिल्यांदा पतसंस्था स्थापन करण्यात आली. प्रशांत चंद्रकांत भालेराव आपल्या उत्तुंग यशाचा आलेख सांगत होते.
भालेराव यांचा बँकिंग क्षेत्राविषयीचा अभ्यास सतत सुरूच होता. बँकां काय- काय सुविधा देतात, ग्राहकांना कशाची गरज आहे. याचा अभ्यास करताना काही त्रुटी लक्षात आल्या. एकाच छत्राखाली आपण बचत व चालू खाते, विविध कर्ज, ठेवी व अन्य आर्थिक सुविधा ग्राहकांना दिल्यास ते ग्राहकांच्या अधिक फायद्याचे ठरेल, ही बाब लक्षात आल्यावर पतसंस्थेनंतर लगेचच चार वर्षात म्हणजे 2008 मध्ये रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप अर्बन सोसायटी सुरू झाली. उत्तम प्रशासन, विनम्र कर्मचारी, तत्पर सेवा या त्रिसूत्रीच्या जोरावर आज महाराष्ट्र, गुजरात, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्रप्रदेश आदी नऊ राज्यात रेणुकामाता मल्टीस्टेटचा विस्तार झाला आहे. या संस्थेद्वारे ग्राहकांना विविध आर्थिक सेवा उपलब्ध आहेत.
* मुदत ठेव पावती- अल्प (31 दिवसांपासून ते 180 दिवसांपर्यंत), मध्यम, दीर्घ मुदत ठेव खाते, दामदुप्पट ठेव योजना, कॅश सर्टिफिकीट खाते, पिंगमी व रिकरिंग खाते, शेअर्स, अक्षय ठेव योजना, विमा सुरक्षा योजना कार्यान्वित आहे.
* सुलभ कर्ज- व्यक्तीगत, वाहन तारण, व्यावसायिक, गृह तारण, कॅश क्रेडिट, तारण मालमत्ता, मुदत ठेव तारण आदी विविध प्रकारच्या कर्ज सुविधा उपलब्ध आहेत.
* इंटरनेट बँकींग – मल्टीस्टेटचे स्वतः अॅप तयार करण्यात आले असून खातेदार आपले सर्व बँकिंग व्यवहार अगदी चोवीस तास करू शकतात. 27 हजार सभासद या सेवेचा लाभ घेतात.
* सर्व बील पेमेंट – खातेदार, मोबाईल अॅप व इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून वीज, टेलिफोन, मोबाईल बिल, डीटीएच रिचार्ज करू शकतात. विमान व बस तिकीटांचे बुकिंग, पाणीपट्टी, विमा हप्ता भरणे, डी मॅट व ट्रेडींग अकौंट उघडणे या सेवा या अंतर्गत दिल्या जातात.
* एटीएम कार्ड – एटीएम कार्डद्वारे भारतातील कोणत्याही बँकेच्या एटीएम मशीनमधून पैसे काढता येवू शकतात. संस्थेकडे स्वतःची 17 एटीएम मशीन आहेत. तसेच रुपे कार्डची सुविधा घेणारे 2 लाख ग्राहक आहेत.
* पॉज टर्मिनल – संस्थेचे 70 हजार पॉज मशीन कार्यान्वित आहेत. संस्थेने सभासद व्यवसायिकांना ग्राहकांकडून रोख पैसे न घेता डेबिट किंवा क्रेडिट कार्डवरून विकलेल्या मालाचे पेमेंट त्यांच्या खात्यात थेट जमा करता येते.
* लॉकर सुविधा – छोटे, मध्यम व मोठ्या आकाराची लॉकरची सुविधा येथे उपलब्ध आहे.
संस्थेचे 10 लाख 50 हजार सभासद असून पारदर्शक व्यवहार आणि विश्वासार्हता याचेच हे प्रतिक आहे. संस्था स्वतः कर्मचार्यांची प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करते. महाराष्ट्र क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी अंतर्गत स्वतःचे ट्रेनिंग सेंटर असणारी रेणुकामाता मल्टीस्टेट संस्था एकमेव आहे. महाराष्ट्रात फक्त पाच संस्थात कोअर बँकिंग सिस्टीम प्रणाली असून त्यातही रेणुकामाताने अव्वलस्थान टिकविले आहे. दर तीन महिन्यांनी संस्थेच्या कर्मचार्यांचा स्नेहमेळावा आयोजित केला जातो. मराठवाडा विभागाचा बीडला, विदर्भाचा अकोले येथे, पश्चिम महाराष्ट्राचा अहमदनगरला मेळावा होतो. यात कामाचा आढावा घेताना कर्मचार्यांना काम करताना येणार्या अडचणी जाणून घेवून त्यासंदर्भातील उपाययोजना सुचविल्या जातात. त्यामुळे विविध शाखांमधील कर्मचार्यांच्या ओळखी होतात. विचारांचे आदानप्रदान होते. कर्मचार्यांच्या कौटुंबिक अडचणींविषयी सल्लामसलत होते. तसेच कर्मचार्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी संस्था आर्थिक सहयोग देते.
आपल्या संस्थेविषयी भरभरून बोलताना प्रशांतजी मध्येच भावूक होतात. वडिल कै. चंद्रकांतजी आणि बंधू कै. योगेशजी यांच्या आठवणींशिवाय त्यांचा एकही दिवस सरत नाही. माहुरची रेणुकामाता हे त्यांचे कुलदैवत. आपल्या कुलदेवतेचा कृपाशीर्वाद सदैव असावा, या हेतूने रेणुकामाता या नावाने संस्था सुरू केल्याचे प्रशांतजी नमूद करतात. रेणुकामातेचे पूजन केल्यानंतरच ते दैनंदिन कामांना प्रारंभ करतात. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील अमरापूरला माहुरच्या रेणुकामातेचे ठाणे आहे. 1997 पासून दर पौर्णिमेला अमरापूरला नवचंडी यागा होतो. 5 हजारांचा भंडारा भालेराव कुटूंबियांतर्फे असतो.
गुरूचरित्राचे पारायण केले जाते. तर दरवर्षी फेब्रुवारी, मे, ऑगस्ट आणि नोव्हेंबर महिन्यात प्रशातंजी स्वतः माहुरला रेणुकामातेच्या दर्शनाला जातात. तीन दिवस मुक्काम करून तेथे सेवा देण्याचा प्रयत्न करतात. रेणुकामाता मल्टीस्टेटचे नऊ राज्यातला विस्तार, एक ते दीड हजार कर्मचारी, 130 शाखा आणि करोडोंची उलाढाल हे सगळं तुम्ही कसे जमवता असे विचारल्यावर प्रशांतजी हलके हसतात. मी केवळ निमित्तमात्र असून रेणुकामाता माझ्याकरवी सर्व करवून घेते असे म्हणत पुन्हा देवीच्या चरणी नतमस्तक होतात. आजच्या श्रेय लाटण्याच्या भाऊगर्दीत प्रशांतजी आयडॉल ठरावेत. कोट्यवधींची दैनंदिन उलाढाल असणार्या प्रशांतजींचे पाय मात्र आजही जमिनीवर आहेत. त्यांच्याशी गप्पा म्हणजे आर्थिक सैर असते. रेणुकामातेच्या एका निस्सीम भक्ताला भेटण्याचा आनंद आपल्यालाही होतो.
541 कोटींच्या ठेवी
संस्थेची आर्थिक स्थिती अतिशय भक्कम आहे. आज पतसंस्था, मल्टीस्टेट यांच्या व्यवहाराबद्दल समाजात संशयाने पाहिले जात असले तरी रेणुकामाता मल्टीस्टेटने आपली विश्वासार्हता कायम जपली आहे. संस्थेकडे एकूण 541.53 कोटी रुपयांच्या ठेवी असून 25.20 कोटी कर्जाचे वाटप केले आहे. एकूण गुंतवणूक 508 कोटी रुपयांची आहे. सतत ऑडिट अ वर्ग मिळविणार्या रेणुकामाता मल्टीस्टेटचा एन. पी. ए. दर शून्य टक्के असल्याचे भालेराव यांनी सांगितले.
आर्थिक क्षेत्रातील डॉक्टरेट
रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या प्रशांत भालेराव यांना इंडियन सिग्नेचर ब्रॅण्डच्यावतीने आर्थिक तज्ञ पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. सन 2020 मध्ये अमेरिकेतील ग्लोबल पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने प्रशांतजींना व्यावसायिक प्रबंधन या विषयावरील डॉक्टरेट पदवी देवून सन्मानित करण्यात आले. आर्थिक क्षेत्रातील उल्लेखनिय कार्याबद्दल इंटरनॅशनल ग्लोरी अॅवॉर्ड हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
लवकर होणार खासगी बँक
रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसायटीचे आता लवकरच खासगी बँकेत रुपांतर होणार आहे. त्या दृष्टीने रिझर्व्ह बँकेकडे प्रस्ताव दाखल करून पाठपुरावा सुरू असल्याची माहिती भालेराव यांनी दिली.