कोपरगाव – आपल्या प्रेमप्रकरणात अडथळा ठरत असलेल्या लहान बहिणीला मोठ्या बहिणीने ओढणीने गळा आवळून जीवे मारले. त्यानंतर आत्महत्येचा बनाव करणाऱ्या बहिणीचा डाव पोलिसांनी उधळून लावला. हर्षदा नवनाथ बानकर (वय 16, रा. तिनचारी, कोकमठाण कोपरगाव) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. मुलीच्या आईने फिर्याद दिली असून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत मोठ्या मुलीला अटक केली.
तीनचारी येथे हर्षदा बनकर हिने दि. 30 सप्टेंबर रोजी साडे चार वाजेपूर्वी पलंगाला दोरी अडकून गळफास घेतल्याची घटना घडली. पोलिसांनी याबाबत अकस्मात गुन्हा दाखल केला होता. घटनेबाबत परिसरात उलटसुलट चर्चा सुरू होती. घटनेच्या दिवशी मयत हर्षदाची मोठी बहीण घरातून गायब झाली होती. त्यामुळे आणखी संशय बळावत होता.
पोलिसांनी केलेल्या तपासात मयताची मोठी बहिण सृष्टी नवनाथ बानकर (वय 19) ही तिचा प्रियकर याच्या समवेत पळून गेल्याचे उघड झाले. पोलिसांनी मोठ्या बहिणीस खंडाळा (ता.श्रीरामपूर) येथून ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवला असता आरोपी सृष्टी हिने गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपी सृष्टी हिचे युवकाशी प्रेम संबध होते. त्याने सृष्टीस मोबाईल भेट दिला होता. सदरचा मोबाईल हर्षदा हिने पकडून आई-वडिलांना दिला. तिचे प्रेम प्रकरण उघडकीस आणले. त्यातून तिचे महाविद्यालयीन शिक्षण बंद करण्यात आले होते. याचा राग मनात सृष्टी हिने ठेवला. 30 सप्टेंबर रोजी सृष्टी प्रियकरासमवेत पळून जाण्याच्या तयारीत असताना मयत हर्षदाने तिला अडविण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग आल्याने आरोपी सृष्टी हिने मयत हर्षदा हिचा ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, पोलिसांनी मयताच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून सृष्टी बानकर विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयात तिला हजर केले असताना दि. 9 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी दिली. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.