प्रभात वृत्तसेवा,पुणे, दि. 29 –महापालिका निवडणुकीसाठी शुक्रवारी काढण्यात आलेल्या इतर मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी) आरक्षणाचा परिणाम निवडणुकीसाठी निश्चित करण्यात आलेल्या 58 मधील 7 प्रभागांवर झाला आहे. या सोडतीत ओबीसी तसेच महिलांचे खुल्या गटातील आरक्षण काढण्यात आले. यात या प्रभागांमध्ये असलेल्या तीनही जागांवर आरक्षणे पडली असल्याने या प्रभागांमध्ये एकही जागा सर्वसाधारण गटासाठी राहिलेली नाही. या प्रभागांमधून जातींसाठीचे आरक्षित उमेदवार अथवा ओबीसी आणि सर्वसाधारण गटातील महिला उमेदवारच निवडणूक लढवू शकणार असून, सर्वसाधारण गटातून निवडणूक लढवून महापालिकेत जाण्याच्या तयारी असलेल्या अनेकांना आपल्या इच्छेवर पाणी सोडावे लागणार आहे. या प्रभागांमध्ये प्रभाग क्रमांक 3 लोहगाव- विमाननगर, प्रभाग 21 कोरेगाव पार्क, प्रभाग 37 जनता वसाहत-दत्तवाडी, प्रभाग 42 रामटेकडी- सय्यदनगर, प्रभाग 46 महंमदवाडी-उरुळी देवाची, प्रभाग 47 कोंढवा बुद्रुक- येवलेवाडी या प्रभागांचा समावेश आहे.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, महापालिकेने एससी आणि एसटी आरक्षण कायम ठेवत, उर्वरित 148 खुल्या जागांवर ओबीसी आणि महिलांसाठीचे आरक्षण काढले. त्यामुळे शहरातील अनेक प्रभागांमध्ये राजकीय गणिते बदलणार असून, त्यात तिकिटासाठी भाजपच्या नगरसेवकांना सर्वाधिक रस्सीखेच करावी लागणार आहे. तर अनेक विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या प्रभागात सर्वसाधारण आरक्षण पडले आहे. यामध्ये माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी सभागृह नेते गणेश बिडकर, धीरज घाटे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, माजी विरोधी पक्ष नेत्या दीपाली धुमाळ, शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार, मनसे गटनेते साईनाथ बाबर, शहराध्यक्ष वसंत मोरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, रिपाईच्या गटनेत्या सुनीता वाडेकर, तसेच भाजपच्या महापालिकेतील आजी-माजी पदाधिकाऱ्यांचे प्रभाग सुरक्षित झाले आहेत. मात्र, यातील अनेक पदाधिकाऱ्यांना प्रभागात तीनच जागा, त्यातही दोन जागा महिलांसाठी राखीव असल्याने तिकिटासाठी पक्षात तगडी फिल्डींग लावावी लागणार आहे. विशेषत: भाजपच्या विद्यमान नगरसेवकांना पक्षाचा हक्काचा मतदार असलेला प्रभाग पदरात पाडून घेण्यासाठी झगडावे लागणार आहे.
महिलांची उपस्थिती नगण्यच…
ओबीसी आरक्षण सोडतीत ओबीसी महिला आणि सर्वसाधारण गटातील महिलांसाठीचे फेर आरक्षण आज काढण्यात आले. आरक्षणाच्या उत्स्कुतेपोटी का होईना, पण इच्छूक महिला उमेदवार उपस्थित राहतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, प्रत्यक्षात या सोडतीस हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या महिलाही उपस्थित नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र, त्याच वेळी प्रभागात महिला आरक्षण पडल्यानंतर अनेक कार्यकर्ते जल्लोष करताना दिसत होते.