कंटेन्मेंट झोनबाहेर बाधितांच्या संख्या वाढीचा वेग अधिक
पुणे – कंटेन्मेंट झोनमध्येच करोनाबाधित रुग्ण आहेत; त्यामुळे आपण सुरक्षितरित्या फिरू शकतो, या बिनधास्त मानसिकतेनेच कंटेन्मेंट हद्दीबाहेर बाधितांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढत असून यातून रुग्णांचा आकडा “फुगतो’ आहे.
लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात (अनलॉक 1) मध्ये प्रतिबंधित नियम मोठ्या प्रमाणात शिथिल करण्यात आले. आता, ज्या भागात बाधित रुग्ण नाहीत त्या परिसरातील अनेक व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत आणि त्यामुळेच कंटेन्मेंट हद्दीबाहेर बाधितांची संख्या वाढली आहे. कंटेन्मेंट क्षेत्र सिमीत केल्यानंतर 15 दिवसांतच त्याबाहेर सुमारे दीड हजार रुग्ण आढळून आले आहेत. तर, नवे “हॉटस्पॉट’ तयार झाले आहेत.
पहिल्या दोन लॉकडाऊनमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यावेळी कोणत्याही प्रकारची शिथिलता देण्यात आलेली नव्हती. मात्र, तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली. या वेळेपर्यंत महापालिका क्षेत्रात सुमारे 69 भाग कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर याच भागात नव्हे; तर, शिथिलता दिलेल्या भागात रुग्णांची संख्या 500पर्यंत पोहोचली. चौथ्या लॉकडाऊनवेळी महापालिकेने बाधित रुग्णांचा आढावा घेऊन काही क्षेत्रे वगळली तर काही नव्याने समाविष्ट केली. यावरून कंटेन्मेंट वगळता अन्य भागातील रुग्णांची वाढ ही जवळपास 40 टक्क्यांपर्यंत गेली.
पाचव्या लॉकडाऊनमध्ये तर काहीच क्षेत्रे वगळता सर्व क्षेत्रे सुरळीत करण्यात आली आहेत. खासगी आस्थापना, दुकाने आणि अन्य व्यवहार सुरू ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे करोना बाधितांचा भडका अधिकच उडाला असून, रोजची बाधितांची संख्या ही 300च्या पुढे झाली आहे. स्वॅब टेस्टींग वाढविण्यात आल्याने यातून बाधित रुग्ण समोर येत असल्याने रुग्णांची संख्याही वाढत आहे. परंतु, रुग्णांत लागण मोठ्या प्रमाणात होत असल्याचेही यातून स्पष्ट होत आहे. रविवारी तर नव्याने 620 बाधितांची नोंद करण्यात असून हा आकडा धोका वाढत असल्याचे सूचित करीत असल्याचे स्पष्ट होत आहे.
15 हजार 556 बेड्स…
शहरात करोना बाधितांसाठी महापालिकेने आतापर्यंत 15 हजार 556 बेड्सची सुविधा केली आहे. त्यामध्ये 3 हजार 722 जणांवर उपचार सुरू आहेत. 13 हजार 43 बेड्स हे आयसोलेशन असून, त्यामध्ये 2 हजार 936 बेड्सवर व्यक्तींना उपचार देत आहेत. ऑक्सीजनची सुविधा असलेले 2 हजार 513 बेड्सपैकी 531 बेड्स वापरात आहे. अतिदक्षता विभागात एकूण 868 बेड्सची सुविधा आहे. त्यामध्ये 288 बेड्सला व्हेंन्टीलेटर सुविधा असून, 49 जणांवर उपचार सुरू आहे. तर 580 बेड्स हे व्हेंन्टिलेटर नसलेले आहेत.