अहवाल लवकर मिळण्यास होणार मदत : खासगी लॅबबरोबर बोलणी सुरू
पुणे – करोना चाचण्यांची संख्या वाढल्याने रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. संख्या वाढत असली तरी घाबरण्याचे अथवा चिंता करण्याचे कारण नाही. लवकर रुग्ण आढळल्याने त्यांच्यावर उपचार करणे सोपे होईल. यामुळे फायदाच होणार आहे. दररोज अधिकाधिक चाचण्या व्हाव्यात, यासाठी दर दिवसाला 500 चाचण्यांचा खर्च पुणे महापालिका करणार आहे. यासाठी खासगी लॅबबरोबर बोलणी सुरू असून येत्या दोन दिवसांत याबाबत निर्णय होईल, अशी माहिती आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.
ऑनलाइन पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली. राज्य शासनाने करोना चाचण्यांसाठी खासगी लॅबला प्रति चाचणी 2 हजार 200 रुपये इतका दर निश्चित केला आहे. सद्य:स्थितीत 500 ते 600 चाचण्यांचा अहवाल येण्यास जास्त उशीर होत आहे. त्यामुळे त्यांचे अहवाल येणे मागे रहाते.
दर शुक्रवारी कंटेन्मेंट झोन जाहीर होणार
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर नागरिकांची ये-जा वाढली आहे. त्यामुळे कंटेन्मेंट झोनमध्ये 60 टक्के रुग्ण, तर बाहेर 40 टक्के आढळत आहे. यापूर्वी कंटेन्मेंट झोनच्या बाहेर करोनाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण 15 ते 20 टक्के होते. ते आता वाढले आहे. यामुळे दर 15 दिवसांनी कंटेन्मेंट झोनचा आढावा घेण्यात येत होता. तो आता दर आठ दिवसांनी घेण्यात येणार असून दर शुक्रवारी कंटेन्मेंट झोन जाहीर होणार आहे. बालेवाडी स्टेडियम येथील करोना रुग्णालय मंगळवारपासून सुरू होणार आहे.