फलटण -मठाचीवाडी परिसरात वन्यप्राण्याच्या पावलांचे ठसे दिसले असून तो बिबट्या आहे की तरस, याची चर्चा सुरू आहे. टाकळवाडे, ता. फलटण येथे बिबट्या दिसल्याने वन विभागाने पिंजरे व ड्रोन कॅमेरे लावून शोधमोहीम सुरू केली आहे. त्याच वेळी परिसरातील मठाचीवाडी, निंबळक, पिंप्रद, मिरढे येथे बिबट्याचा वावर असल्याच्या बातमीने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे; मात्र टाकळवाडे वगळता अन्यत्र दिसलेला वन्यप्राणी बिबट्या नसून तरस असल्याचा खुलासा वनाधिकाऱ्यांनी केला आहे.
मठाचीवाडीनजीक शेरे वस्ती, भोसले वस्ती भागात काल (दि. 21) सकाळी वन्यप्राण्याच्या पायाचे ठसे आढळल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे; परंतु ते ठसे बिबट्याचे नसून तरसाचे आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन वन विभागाने केले आहे. टाकळवाडे, निंबळक भागात गेले 15 दिवस वावर असलेला बिबट्या वन विभागाला हुलकावणी देत आहे. टाकळवाडे येथील पाटील वस्ती व निंबळक इरिगेशन बंगला, 29 फाटालगतच्या करे वस्ती परिसरात दोन पिंजरे व कॅमेरे वन विभागाने लावले आहेत.
त्यांची दिशा बदलून बिबट्याचा माग काढण्याचा प्रयत्न वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी आहेत; परंतु बिबट्या पिंजऱ्यात सापडलेला नाही. सध्या खरीप हंगामाच्या पूर्वतयारीत शेतकरी व्यग्र आहेत. अनेक ठिकाणी ऊस लागणीला वेग आला आहे. भाजीपाल्याची तोडणी सुरू आहे. अशा वेळी वन्यप्राण्यांच्या वावरामुळे शेतकरी एकट्याने बाहेर पडण्यास धजावत नाहीत. महिला, लहान मुलांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात येत आहे.
या स्थितीत मठाचीवाडीलगतच्या शेरे वस्तीतील संदीप निकम हे त्यांच्या शेतात गेले असता, केळीच्या बागेत त्यांना वन्यप्राण्याच्या पायाचे ठसे दिसले. बांधावर ठेवलेल्या हंड्यातील पाणी कमी झाल्याने हा प्राणी रात्री हंड्यातील पाणी पिऊन गेल्याची खात्री निकम यांनी व्यक्त केली आहे. भोसले वस्तीतील उसातही ठसे दिसले. वन विभागाने बिबट्या व त्याच्या दोन पिल्लांना पिंजऱ्यात बंद करावे, अशी मागणी होत आहे. तालुक्यात वन्यप्राण्यांचा वावर वाढतो आहे. अनेक ठिकाणी तरसाच्या पायांचे ठसे दिसत आहेत. मठाचीवाडी येथेही तरसाचेच ठसे असून नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन वनक्षेत्रपाल एम. यू. निकम यांनी केले आहे.