92 टेबलवर होणार मतमोजणी, प्रत्येक टेबलवर चार कर्मचारी
1500 कर्मचाऱ्यांची नियुक्ती : मावळ, शिरुरसाठी प्रशासन सज्ज
पिंपरी – प्रचाराची धाम-धूम संपली, निवडणुकाही झाल्या त्यानंतर नागरिक आणि राजकीय मंडळींमध्ये शांतता असली तरीही प्रशासनाची गडबड अजून संपलेली नाही. शांततापूर्ण वातावरणात निवडणुका संपन्न केल्यानंतर आता निवडणूक विभाग मतमोजणीच्या तयारीला लागली आहे. जशी-जशी मतमोजणीची तारीख जवळ येत आहे तसे-तसे उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची धाकधुक वाढू लागली आहे. इकडे मतमोजणीच्या तयारीत प्रशासनही मग्न झाले असून मतमोजणीची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. यावेळी पहिल्यांदाच प्रत्येक विधानसभेतील पाच मतदान यंत्रांच्या मतांची व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्यांसोबत पडताळणी केली जाणार आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार बालेवाडी येथील क्रीडा संकुलात एकाच दिवशी मावळ आणि शिरुर या दोन्ही लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार असल्याने निवडणूक विभागाला अतिरिक्त दक्षता घ्यावी लागत आहे. त्यामुळे, मतमोजणीच्या कामासाठी कर्मचारीही मोठ्या प्रमाणात नियुक्त करावे लागले आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी 92 टेबलवर व्यवस्था करण्यात आली आहेत. एका टेबलवर सूक्ष्म निरीक्षक, मतमोजणी पर्यवक्षेक, सहाय्यक पर्यवक्षेक आणि एक शिपाई असे चार कर्मचारी असतील. त्याबरोबरच रनर, कोतवाल असे सुमारे एक हजार कर्मचारी मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांना दोन दिवस प्रशिक्षण देऊन प्रशिक्षितही केले जाणार आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघानिहाय मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली आहे. एका विधानसभा मतदारसंघासाठी 14 टेबल असणार आहेत. तर, पोस्टल मतदानाची मोजणी ही वेगळ्या 8 टेबल वर करण्यात येणार आहे. एकूण 92 टेबल असणार आहेत. ईव्हीएम मशीन ने-आण करण्यासाठी रनर, स्ट्रॉंगरुमसाठी, वाहतूक, खानपान सुविधेसाठी, कोतवाल असे एकूण सुमारे एक हजार कर्मचारी मतमोजणी दिवशी कार्यरत असणार आहेत.