Manoj Jarange Patil movie : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने वेळोवेळी हुलकावणी दिली आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील मुंबईकडे उद्या 20 जानेवारीपासून कूच करणार आहे. त्यावेळेसच्या आंदोलनासाठी जरांगे यांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम सुरु केले आहे. आता मुंबईकडे कूच केल्याशिवाय पर्याय नाही.
राज्यातील गावोगावचे साखळी उपोषण स्थगित करून लोकांनी मुंबईला पायी प्रवासाची तयारी करावी, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी निर्णायक लढा पुकारला असून, अंतरवाली सराटीतून उद्या सकाळी 9 वाजता मुंबईकडे प्रस्थान करण्यात येणार आहे.
आंदोलनं, उपोषणं करून त्यांनी आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. त़्यांना राज्यभरातून तुफान पाठिंबा मिळत आहे. अत्यंत साध्या अशा या कार्यकर्त्याचा जीवनपट आणि आरक्षणासाठीचा संघर्ष समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी ‘संघर्षयोद्धा- मनोज जरांगे पाटील’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी याठिकाणी सुरू झालं आहे.
यावेळी स्वतः मनोज जरांगे पाटील, निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपटाची टीम आवर्जून उपस्थित होती. येत्या 26 एप्रिल रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. चित्रीकरणाच्या पहिल्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारत असलेले ‘रोहन पाटील’, अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख हे देखील उपस्थित होते.
गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाची कथा आणि निर्मिती केली आहे. तर सुधीर निकम यांनी पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित केल्या पासूनच लोकांमध्ये या चित्रपटाची खूपच उत्सुकता आहे. सोशल मीडियावर देखील या चित्रपटच पोस्टर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.