कनेक्शन नियमित करण्यासाठी आकारला जाणार 2 हजार दंड
नगर – महापालिकेने नगर शहरातील अनधिकृत नळकनेक्शन शोध मोहीम राबविण्याचा एकदाचा निर्णय घेतला आहे. 1 मार्च 2020 ते 31 मार्च 2021 दरम्यान ही मोहीम राबविण्यात येणार असून अनधिकृत नळकनेक्शन आढळून आल्यास संबंधितांवर विशेष दंडनिहाय आकारणी करून कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई केली जाणार आहे. या कालावधीतमध्ये नळकनेक्शन अधिकृत करण्यासाठी रक्कम देखील निश्चित करून देण्यात आली असून त्यात 2 हजार दंड आकारून संपूर्ण 5 हजार 700 रुपयांमध्ये नळकनेक्शन नियमित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शहरातील अनधिकृत नळकनेक्शनबाबत दैनिक “प्रभात’ने वाचा फोडली होती. महापालिकेने तोटा भरून काढण्यासाठी अनधिकृत नळकनेक्शन शोधून त्यांना नियमित पाणीपट्टी भरण्यास प्रवृत्त करण्याचा पर्याय दिला होता. त्यानुसार आज महापालिकेने ही मोहीम सुरू केली आहे. नगर शहरात नव्याने वाढीव पाणीपुरवठा योजना फेज-2 योजना लवकरच कार्यान्वित होणार आहे. त्यासाठी नव्याने नळकनेक्शन द्यावे लागणार असल्याने त्यातून आता अनधिकृत नळकनेक्शनचा मुद्दा समोर आला. नगर शहरात 1 लाख 15 हजारहून अधिक मालमत्ताधारक आहे.
त्यात रहिवासी मालमत्ताधारक 90 हजार असून अधिकृत नळकनेक्शनधारक केवळ 54 हजार आहे. त्यामुळे 40 हजार नळकनेक्शन हे अनधिकृत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सध्या महापालिकेला पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून तब्बल 20 कोटींची तोटा सहन करावा लागत आहे. हा तोटा भरू काढण्यासाठी महापालिका प्रशासनाने पाणीपट्टीत दुप्पटीने वाढ करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीकडे दिला होता. सध्या 1 हजार 500 रुपये पाणीपट्टी असून त्यात दुप्पटीने वाढ करणे सत्ताधाऱ्यांच्या दृष्टीने अडचणीचे ठरणार असल्याने पाणीपट्टी वाढीचा विषय सत्ताधाऱ्यांनी फेटाळला.
पाणीयोजनेला होणार तोटा व अधिकृत नळकनेक्शन यात असलेली तफावत पाहून आता अनधिकृत नळकनेक्शन शोधण्याची मोहीम महापालिकेने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. एक वर्ष ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत अनधिकृत नळकनेक्शन आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
नळ कनेक्शन नियमित होणार
या कालावधीमध्ये नळकनेक्शन नियमित करण्याची संधी देण्यात आली असून त्यासाठी रक्कम निश्चित करण्यात आली आहे. अर्धा इंची घरगुती वापर नळकनेक्शनसाठी चालू वर्षाची पाणीपट्टी 1 हजार 500, सेवा शुल्क 700, डिपॉझिट 1 हजार 500 व दंड 2 हजार अशी 5 हजार 700 रुपये भरल्यास नळकनेक्शन अधिकृत होणार आहे.