पुणे – महापालिकेलाही पाच दिवसांचा आठवडा लागू झाल्यानंतर सोमवारी उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. मात्र, दुसऱ्याच दिवशी प्रशासनाने आपली तपासणी मोहीम गुंडाळली आहे. त्यामुळे पालिकेची कारवाई केवळ दाखविण्यापूर्ती होती का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राज्य शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांना 29 फेब्रुवारीपासून पाच दिवसांचा आठवडा लागू केली आहे. शासनाचा अध्यादेश निघताच पालिकेनेही लगबगीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय लागू केला. यानंतर सोमवारी महापालिकेचा पहिला दिवस होता. त्यामुळे प्रशासनाने उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती घेण्यासाठी पथके नेमली तसेच तपासणीही केली. त्यात सुमारे 350 कर्मचारी उशिरा आल्याचे दिसून आले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही तपासणी मोहीम महापालिकेने गुंडाळली आहे. कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृती झाल्याचे सांगत ही तपासणी मोहीम बंद केली आहे.
मुख्य इमारतीचं झालं… क्षेत्रीय कार्यालयाचं कायं
महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने मुख्य इमारतीमध्ये तपासणी केली असली तरी मिनी महापालिका म्हणून ओळखली जाणारी क्षेत्रीय कार्यालये तसेच इतर कार्यालये मात्र तपासणीपासून बाहेर आहेत. त्यामुळे त्यांच्या वेळेचे काय असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.