जम्मू – राजस्थान, पंजाबसारख्या काही राज्यांमधील कॉंग्रेसच्या प्रदेश शाखांमधील अंतर्गत संघर्ष ताजा असतानाच त्या पक्षाच्या जम्मू-काश्मीर शाखेतील धुसफूस शिगेला पोहचली आहे. त्यातून जम्मू-काश्मीरमधील चार माजी मंत्री आणि तीन माजी आमदारांनी पक्षाच्या पदांचे राजीनामे दिले. ते ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचे निकटवर्तीय मानले जातात.
संबंधित नेत्यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाच्या प्रभारी रजनी पाटील यांच्याकडे राजीनामापत्रं पाठवली. पक्षश्रेष्ठी आपली गाऱ्हाणी ऐकून घेत नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली.
राहुल यांनी नुकताच जम्मू-काश्मीरचा दौरा केला. त्यावेळी प्रयत्न करूनही राहुल यांची भेट मिळू शकली नाही, असे म्हणत संबंधित नेत्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जी.ए.मिर यांच्यावरही टीकास्त्र सोडले. मिर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची स्थिती बिकट होत चालली आहे.
याआधीच अनेक नेते कॉंग्रेसला रामराम ठोकून इतर पक्षांत दाखल झाले आहेत. मोजक्या नेत्यांनी प्रदेश शाखेवर कब्जा केला आहे, असे आरोपही त्यांनी केले. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीची घोषणा लवकरच होऊ शकते, याकडेही पदांचे राजीनामे देणाऱ्या नेत्यांनी लक्ष वेधले आहे.