मुंबई – बॉलीवूड बादशाह शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटावरून सुरू असलेला वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. नुकतीच एनएचआरसीमध्ये बेशरम रंग हे गाणे चित्रपटातून काढून टाकण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. आणि त्यानंतर अयोध्येच्या संताने वादग्रस्त विधान केले. या चित्रपटाला विरोध करत संत जगतगुरु परमहंस आचार्य यांनी तर शाहरुख खानला जिवंत जाळण्याची धमकी काही दिवसांपूर्वी दिली होती.
अयोध्येतील संत जगतगुरु परमहंस आचार्य यांनी पठाण चित्रपटाला विरोध करत पठाण चित्रपटात भगव्या रंगाचा अपमान करण्यात आल्याचे म्हटले आहे. ‘हिंदूंच्या भावना दुखावण्यासाठी लोकांनी विचारपूर्वक रणनीती आखून पैसे कमविण्याचा धंदा केला आहे. हा चित्रपट जिहाद आहे, रणनीती तयार करून केला आहे, म्हणून आज शाहरुख खानचे पोस्टर जाळले आहे आणि ज्या दिवशी शाहरुख खान सापडेल त्या दिवसाच्या शोधात आहे, त्या जिहादीला जिवंत जाळून टाकेन’. असं विधान त्यांनी केलं होत.
त्यानंतर आता बरोबर 13 दिवसांनी परमहंस आचार्य यांनी किंग खानचं तेरावं केलं आहे. हे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. आचार्य परमहंस हे शाहरुख खानवर प्रचंड नाराज असून त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात त्यांनी एका मडक्यावर शाहरुखचा फोटो लावला असून शेवटी ते मडकं फोडताना दिसतायत. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
परमहंस यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी 13 दिवसांपूर्वी शाहरुखचा पुतळा जाळला होता. आता त्यांनी त्याचं तेरावं केलं आहे. ते म्हणतात, ‘आम्ही दुसऱ्यांच्या आस्थेचा सन्मान करतो पण आमच्या आस्थेचा सन्मान का केला जात नाही. हे मुळीच सहन केलं जाणार नाही. भगवा हा शांतीचा प्रतीक आहे आणि सनातन धर्माच्या सर्व अनुयायांना अभिमान आहे. केशर हे स्वाभिमानाचे प्रतीक आहे. असं देखील ते म्हणाले आहे.
दरम्यान, ‘पठाण’ चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगु या भाषांमध्ये हा रिलीज होणार आहे. परंतु चाहत्यांना चित्रपटाच्या कथेबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही. कारण त्याचा ट्रेलर किंवा प्रोमो अजून रिलीज झालेला नाही. सध्या सोशल मीडियावर चित्रपटातील गाणे तुफान व्हायरल होत असून, फॅन्स देखील यावर आपली प्रतिक्रिया देत आहेत.