नगर – महामंडळाने आगारातील पंप बंद केल्याने बस आता खासगी पेट्रोल पंपावर डिझेल भरत आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी डिझेलचे भाव वाढविल्याने नाईलाजाने एसटीला हा निर्णय घ्यावा लागला. मात्र, या निर्णयातून एसटीचा फायदाच होत असल्याचे समोर आले आहे. याद्वारे महामंडळाचे 20 ते 25 रुपये प्रति लिटर वाचले आहेत. या खासगी पंपांवर बस तासन्तास उभ्या राहत असल्या आणि प्रवाशांना याचा त्रास होत असला तरी एसटी महामंडळाच्या डिझेलवरील खर्चात मोठी बचत होत आहे. डिझेल खरेदीसाठी महामंडळाने द्राविडी प्राणायाम केला खरा मात्र याद्वारे फायदाच होत असल्याचे दिसून येत आहे.
परिवहन महामंडळ सरकारी तेल कंपन्यांकडून डिझेल खरेदी करत होते. मात्र, या कंपन्यांनी महामंडळाला देण्यात येणाऱ्या डिझेलसाठी भावात वाढ केली. त्यामुळे जास्त पैसे देऊन डिझेल खरेदी करणे महामंडळाला कठीण जात होते. मोठ्या प्रमाणात इंधन खरेदी केली जात असतानाही तेल कंपन्यांनी किंमतीत सवलत देण्यास नकार दिला. त्यामुळे मार्च 2022 मध्ये महामंडळाने राज्यातील आगारांना आदेश देत खासगी पंपावरून डिझेल खरेदी करण्याचे आदेश दिले.
या निर्णयामुळे आगारातील पंप बंद करावे लागले. स्थानिक पातळीवर विभागीय कार्यालयांनी पेट्रोल पंप निश्चित करून या ठिकाणावरून डिझेल खरेदी करण्यास सुरुवात केली. या खरेदीमुळे महामंडळाच्या पैशांत मोठी बचत होत आहे. एक लिटर डिझेलमागे जवळपास 20 ते 25 रुपये कमी द्यावे लागत आहेत. आधीच आर्थिक संकटात असलेल्या एसटी महामंडळाला हा मोठा आधार ठरला आहे. मात्र, खासगी पंप बाहेर आहेत. त्यामुळे बऱ्याचदा वाहतूक कोंडी तसेच पंपावरील गर्दी या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
एसटी महामंडळाचा “असा’ दुहेरी फायदा
खासगी पेट्रोल पंपावरून डिझेल खरेदी करताना बाजारभावाप्रमाणे पैसे द्यावे लागत आहेत. तसेच मोठे ग्राहक मिळाल्याने खासगी पेट्रोल पंपचालकांकडून काही सवलतही दिली जात आहे. त्यामुळे एसटीला दुहेरी फायदा मिळाला आहे. सध्या डिझेल 93.13 रुपये प्रति लिटर या दराने विक्री होत आहे. या दरानेच एसटीही इंधन खरेदी करत आहे. तसेच काही पंपचालक आणखीही सवलत देत आहेत. तसेच मार्च 2022 मध्ये ज्यावेळी महामंडळाने हा निर्णय घेतला त्यावेळी महामंडळ सरकारी तेल कंपन्यांकडून साधारण 121 ते 122 रुपये प्रति लिटर दराने डिझेल खरेदी करत होते.