पिंपरी – सर्वच गोष्टी महाग होत असताना आता रक्तही महाग झाले आहे. एका रक्त पिशवीसाठी शंभर रुपयांनी वाढ झाली आहे. खासगी रक्तपेढीतील एका रक्त पिशवीसाठी आता 1 हजार 550 रुपये तर शासकीय रक्तपेढीतील एका रक्त पिशवीसाठी 1 हजार 100 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. रक्ताचे वाढलेले शुल्क गरीब रुग्णांच्या खिशाला मात्र परवडणारे नाही.
शहरात मोठ्या प्रमाणात महापालिकेची अद्यावत रुग्णालये आहेत. तसेच खासगी रुग्णालयांची संख्या मोठी आहे. यामुळे खूप मोठ्या प्रमाणात स्थानिक रुग्ण आणि आसपासच्या ग्रामीण भागातील रुग्ण येथे उपचारासाठी येत असतात. काही आजारांमध्ये नियमितपणे रक्त भरावे लागते. तर अनेक आजारांमध्ये तसेच शस्त्रक्रियेवेळी मोठ्या प्रमाणात रक्त लागते. रक्ताचे वाढलेले दर आता गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांच्या खिशाला झळ देणारे ठरणार आहेत.
नव्या दराप्रमाणे रक्त पिशवी खरेदी करताना रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना मोठा भुर्दंड पडणार आहे. राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेच्या सुचनेनुसार रक्त पिशवीच्या दरवाढीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने रक्ताचे नवीन दर जाहीर केले आहे. यापुढे धर्मादाय, खासगी रक्तपेढ्यांमध्ये रक्ताच्या बाटलीची किंमत 1 हजार 450 वरून 1 हजार 550 रुपये इतकी केली आहे. तर, सरकारी रक्तपेढ्यांमध्ये 1 हजार 50 रुपयांवरून 1 हजार 100 रुपये इतकी झाली आहे.
असे आहेत दर
पूर्वी शासकीय रक्तपेढीत बाहेरच्या रुग्णांसाठी रक्तपिशवी 850 रुपयांना होती. इतर सरकारी रक्तपेढ्यांच्या तुलनेत दर कमी होते. मात्र, आता शासन निर्देशानुसार 11 मार्चपासून रक्त पिशवीचे 1 हजार 100 रुपये नवीन दर लागू झाले आहेत. रक्त घटकांच्या एका पिशवीसाठी असणारे नवीन दर पुढीलप्रमाणे आहेत. 1) अशासकीय रक्तपेढी संपूर्ण रक्त -1 हजार 550, 2) पॅक्ड रेड सेल -1 हजार 550, 3) फ्रेश प्रोझन प्लाझ्मा -400, 4) प्लेटलेट कॉन्सन्ट्रेट – 400, 5) शासकीय रक्तपेढी संपूर्ण रक्त-1 हजार 100, 6) पॅक्ड रेड सेल-1 हजार 100, 7) फ्रेश प्रोझन प्लाझ्मा – 300, 8) प्लेटलेट कॉन्सन्ट्रेट – 300.
बी पॉझिटिव्हला सर्वाधिक मागणी
महापालिकेच्या थेरगाव रुग्णालयाचे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दाद्देवार यांनी सांगितले की, अनेक नागरिकांचा “बी पॉझिटीव्ह” रक्तगट आहे. त्यामुळे “बी पॉझिटिव्ह” रक्तगटाची सर्वाधिक मागणी असते. त्याखालोखाल “ओ” आणि “ए” रक्त गटाची मागणी आहे.