प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 31 – शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता आता यांत्रिक पद्धतीने जेट मशिनद्वारे केली जाणार आहे. त्यासाठी यापुढे महापालिकेच्या सांडपाणी शुद्धीकरण केंद्रात स्वच्छ केलेले पाणी वापरण्यात येणार आहे. हे स्वच्छ केलेले सांडपाणी आतापर्यंत बांधकामे तसेच शहरातील उद्याने आणि रस्ता दुभाजकांसाठी वापरण्यात येत आहे. त्यानंतर आता ते स्वच्छतागृहांसाठीही वापरले जाणार आहे.
स्वच्छतेसाठी पालिकेने निविदा काढलेल्या असून त्यात हे पाणी वापरण्यासह, हे पाणी घेऊन जाण्यासाठी 3 हजार लिटर क्षमतेचा टॅंकर असल्याची अटही असणार आहे. ही माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख उपायुक्त आशा राऊत यांनी दिली. शहरात महापालिकेची सुमारे दीड हजारांहून अधिक सार्वजनिक स्वच्छतागृहे आहेत. त्यांची स्वच्छता महापालिका खासगी ठेकेदाराकडून करून घेते. आतापर्यंत या सफाईसाठी महापालिकेचेच पाणी वापरण्यात येत होते.
या स्वच्छतागृहांना केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या वाहिनीतून अथवा ठेकेदाराकडून पालिकेचाच पाण्याचा टॅंकर घेऊन स्वच्छता केली होती. मात्र, आता या स्वच्छतेसाठी प्रक्रिया केलेले पाणी वापरले जाणार आहे. हे पाणी वापराला देण्यासाठी महापालिकेच्या विद्युत विभागाने सांडपाणी शुद्धीकरण केंद्र आवारात टॅंकर पॉइंट सुरू केले असून त्या माध्यमातून हे पाणी दिले जाते. त्यामुळे आता बांधकाम आणि उद्यानासाठी वापरण्यात येणारे हे पाणी आता स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेसाठी वापरले जाणार आहे.