नगर -शिक्षक बॅंकेची शताब्दी पूर्ण झाली तरी, दिव्यांग शिक्षकांना कायम दुय्यम दर्जाची वागणूक देऊन कोणत्याही पॅनलने दिव्यांगांना पुरेसे प्रतिनिधीत्व दिलेले नाही. तसेच दिव्यांग कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या विशेष सुविधा दिल्या नाही. त्यामुळे जे मंडळ बॅंकेमध्ये सर्व सुविधांसह दिव्यांग कर्मचाऱ्यांना स्वीकृत संचालक म्हणून पुरेसे प्रतिनिधित्व देईल, त्याच मंडळाला राज्य अपंग कर्मचारी, अधिकारी संघटना जाहीर पाठिंबा देईल, अशी माहिती संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष संतोष सरवदे यांनी दिली.
जिल्ह्यात एकूण 387 दिव्यांग शिक्षक कार्यरत आहेत. संघटनेच्या या निर्णयाला सर्व दिव्यांग शिक्षकांनी सहमती दर्शवली आहे. या बैठकीसाठी संघटनेचे जिल्हा सचिव पोपट धामणे, जिल्हा कार्याध्यक्ष राजू आव्हाड, अनिल ओव्हळ, नासिर सय्यद, उद्धव थोरात, रमेश सुपेकर, जयकिसन वाघ, वडीतके, बालाजी चव्हाण, सुनील जाधव, सुभाष फसले, प्रविण एडके आदींसह सर्व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
गुरुजींचा प्रचार जोरात..
दरम्यान, शिक्षक बॅंकेच्या निवडणुकीसाठी रविवारी (दि.16) मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू आहे. मतदानासाठी मतपत्रिका छापल्या आहेत. जिल्ह्यातील 14 तालुक्यात 30 मतदान केंद्र राहणार आहेत. चार मंडळे निवडणूक रिंगणात आहेत. सध्या गुरुजींचा जोरदार प्रचार सुरू आहे. प्रमुख नेत्यांसह दुसऱ्या फळीतील नेते प्रचारात व्यस्त आहेत. कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवायचाच असाच प्रत्येकाचा निर्धार आहे. सत्ताधारी-विरोधकांत जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. रविवारी मतदानानंतर लगेच मतमोजणी होणार आहे.