नवी दिल्ली – बीसीसीआयने महिला आयपीएलबाबतची अनेक दिवसांपासूनची मागणी अखेर मान्य केली आहे. आता पुढील वर्षापासून 6 संघांमध्ये आयपीएल स्पर्धेचे आयोजन करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. याबाबत मुंबईत झालेल्या आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल आणि बीसीसीआयच्या बैठकीत निर्णय झाला आहे.
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले, महिला आयपीएलला एजीएमद्वारे परवानगी मिळणे बाकी आहे. पुढील वर्षापर्यंत महिलांचे आयपीएल सुरू होण्याची आम्हाला अपेक्षा आहे. दरम्यान, मागील काही वर्षांपासून बीसीसीआय महिला आयपीएल स्पर्धा भरवण्याची तयारी करत होता.
वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांनी महिला लीग टी-20 स्पर्धा करण्याचे आयोजन केल्यानंतर बीसीसीआयवर दबाव निर्माण झाला होता. सुरुवातीला महिला आयपीएलमध्ये पाच ते सहा संघांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुरुष आयपीएलमधील सध्याच्या दहा संघांच्या मालकांना महिला संघ खरेदी करण्यास पहिल्यांदा संधी दिली जाणार असल्याचे गांगुलीने सांगितले.
यासोबतच महिला टी-20 चॅलेंज टूर्नामेंट या वर्षी पुन्हा परतेल, असा निर्णय बोर्डाने घेतला. ही तीन संघांची स्पर्धा 2019 मध्ये सुरू झाली, जी आयपीएलच्या प्लेऑफ सामन्यांदरम्यान खेळली गेली. गतवर्षी केवळ 4 सामन्यांची ही स्पर्धा होऊ शकली नाही.