42 पिस्तूल, 66 काडतुसे जप्त : 15 आरोपी गजाआड
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट चारची कामगिरी
पिंपरी – पिस्तूल विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला पकडण्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी 15 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे 20 लाख रूपये किंमतीची तब्बल 42 पिस्तूल आणि 66 जिवंत कडतुसे जप्त केली आहेत.
गणेश माळी (रा. सांगवी), ग्यानोबा उर्फ गोटू मारुती गिते (रा. परळी, जि. बीड), मणीसिंग गुरमुख सिंग भाटिया, कालूसिंग जसवंत सिंग (दोघे रा. सिंघाना, धार, मध्य प्रदेश ), कुश नंदकुमार पवार (रा. तळेगाव दाभाडे), प्रसन्न ज्ञानेश्वर पवार (रा. गोडुंब्रे, शिरगाव), आकाश उर्फ बाळा जगन्नाथ वाघमोडे (रा. कुर्डूवाडी, जि. सोलापूर), योगेश विट्ठल कांबळे (रा. परांडा, जि. उस्मानाबाद), सिराज सलीम शेख (वय 34 रा. आंबेठाण, ता. खेड), प्रकाश उर्फ पप्पू किसन मांडेकर (वय 27, रा. आंबेठाण, ता. खेड, जि.पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यात पोलीस नाईक लक्ष्मण आढारी यांना मिळालेल्या माहितीवरून आरोपी गणेश माळी याच्याकडून एक पिस्तूल हस्तगत केले होते. त्यानी हे पिस्तूल बीड जिल्ह्यातील परळी येथे राहणाऱ्या ज्ञानबा उर्फ गोटू मारुती गिते याच्याकडून घेतल्याचे त्याने सांगितले. गोटू गिते यालाही पोलिसांनी अटक केली. त्या दोघांकडून सहा पिस्तूल आणि 15 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. गिते याने मध्यप्रदेश येथील धार जिल्ह्यातून सरदार नावाच्या व्यक्तीकडून पिस्तूल आणल्याचे सांगितले.
युनिट चारचे वरिष्ठ निरीक्षक मोहन शिंदे यांनी या रॅकेटच्या मुळाशी जाण्यासाठी काही पथके तयार केली. सहायक निरीक्षक अंबरीश देशमुख आणि कर्मचारी प्रशांत सैद यांच्या पथकाने मध्यप्रदेश येथील मुख्य आरोपी मानसिंग उर्फ सरदार भाटिया याला ताब्यात घेत त्याच्याकडून 11 पिस्तूल आणि 22 जिवंत काडतुसे हस्तगत केली.
भाटिया याने अन्य साथीदारांची नावे सांगत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात पिस्तूल विक्री केल्याची कबुली देखील दिली. त्यानुसार या रॅकेटमध्ये सहभागी असणाऱ्या एकूण 26 जणांची नावे निष्पन्न करण्यात आली असून 15 जणांना अटक केली आहे. पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्त राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट चारच्या पथकाने ही कामगिरी केली.