कापूस खरेदीला 15 नोव्हेंबरचा मुहूर्त

खरेदी केंद्र सुरू करण्याच्या हालचाली सुरू : पावसाचा बसला फटका

पुणे – राज्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. त्याचा कापूस खरेदीवरदेखील परिणाम झाला आहे. पावसामुळे आर्द्रता वाढण्याच्या शक्‍यतेने कापूस खरेदी लांबविण्यात आली असली देखील येत्या 15 नोव्हेंबरपासून कापूस खरेदीला सुरुवात केली जाण्याची दाट शक्‍यता आहे.

गेल्यवर्षी राज्यात 39 लाख हेक्‍टरवर कपाशीची लागवड झाली होती. मात्र, कापसाला मिळालेल्या चांगल्या दरामुळे राज्याच्या विविध भागांमधील शेतकरी कापूस पिकाकडे वळाले आहेत. त्यामुळे राज्यातील कापसाच्या क्षेत्रात वाढ होऊन ते 41 लाख हेटरवर पोचले आहे.त्यामुळे यंदा 90 ते 95 लाख कापूस गाठींचे उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, अवकाळी पावसाचा कापसाला देखील मोठा फटका बसला आहे. यंदाच्या उत्पादनात 15 टक्‍के घट येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे 70 ते 80 लाख गाठींपर्यंत कापसाचे उत्पादन खाली येण्याचा अंदाज आहे. अवकाळीमुळे कापूस भिजला असून अनेक ठिकाणी कापसाचा दर्जा खालावला आहे. सीसीआयचा एजंट असलेल्या पणन महासंघाकडून कापसाची खरेदी केली जाते. गेल्यावर्षी कापसाला 5450 रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला होता. यंदा तो 5550 एवढा आहे.

उत्पादकांना मिळणार दिलासा
कापसातील आठ टक्‍के आर्द्रतेचे प्रमाण योग्य मानले जाते तर 12 टक्‍क्‍यांपर्यंतच्या आर्द्रतेचा कापसूदेखील खरेदी केला जातो. मात्र, अद्यापही सीसीआय व पणन महासंघाने कापूस खरेदी केंद्र दिवाळीपूर्वी सुरू करणे अपेक्षित असताना दिवाळी संपली तरी देखील ती सुरू केलेली नाहीत. अवकाळीमुळे कापसाला आणखी फटका बसण्याची सर्वाधिक शक्‍यता आहे. त्यामुळे अवकाळीचे सातत्य आणि शेतकऱ्यांच्या आग्रही मागणीमुळे येत्या 15 नोव्हेंबरपासून खरेदी केंद्र सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे कापूस उत्पादकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.