शिरूरच्या घटनेत वनविभागाची तत्परता

बिबट्याचा हल्ला झालेल्या समृद्धीच्या कुटुंबाला १५ लाखांची मदत

सविंदणे – शिरूर तालुक्‍यातील जांबूतच्या जोरी लवण येथे (दि. 6) रोजी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात समृद्धी योगेश जोरी ही 2 वर्षांची बालिका ठार झाली होती. वन विभागाने तात्काळ पंचनामा करीत तातडीची मदत म्हणून 5 लाख रुपयांचा धनादेश जोरी कुटुंबास दिला होता.

वन विभागाकडून उर्वरित 10 लाख रुपयांची मदत मंजूर झाली असून त्याचे ही धनादेश समृद्धीच्या आई- वडील यांच्या नावे बॅंकेत फिक्‍स डिपॉझिट म्हणून देण्यात येत असल्याची माहिती जुन्नर वन विभागाचे उपवनसंरक्षक अधिकारी जयरामे गौडा यांनी दिली. जोरी कुटुंबास मिळणाऱ्या 10 लाख रुपयांच्या मदत मंजुरीबाबतचे पत्र वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त झाल्याची माहिती शिरूरचे वन अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी दिली.

जांबूतच्या जोरी लवण व परिसरात बिबट्याची दहशत कायम आहे. पाळीव जनावरांवर बिबट्याचे हल्ले सुरूच असल्याचे सामाजिक कार्यकर्ते योगेश जोरी यांनी सांगितले. बिबट्याच्या दहशतीने दिवसाही नागरिक भीतीयुक्‍त जीवन जगत आहेत. समृद्धी जोरी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्यानंतर परिसरात वनविभागाने 9 पिंजरे लावले असले तरी अद्याप एकाही पिंजऱ्यात बिबट्या न अडकल्याने नागरिक धास्तावले आहेत.

त्यातच लहू सरोदे यांनी घरासमोर दोरीने बांधलेली शेळी बिबट्याने ओढून नेत तिला ठार मारल्याने आणखीच भीती पसरली आहे. अनेक शेतकऱ्यांनी बिबट्यांपासून पशुधनाचे संरक्षण व्हावे म्हणून त्यांच्या गोठ्याला लोखंडी जाळ्या बसविल्या आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)