कुख्यात शरद मोहोळ व चार साथीदारांना ‘त्या’ प्रकरणात जामीन

पुणे – खूनाच्या गुन्ह्यातून सुटल्यानंतर शक्ती प्रदर्शन करणे, तसेच एका कार्यक्रमाला हजेरी लावल्या प्रकरणात कुख्यात शरद मोहोळ आणि त्याच्या चार साथीदारांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.ए.शेख यांनी जामीन मंजुर केला आहे. मंगळवारी (दि.16) रात्री पाच जणांना अटक केली होती. पोलिसांनी बुधवारी सर्वांना न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने सर्वांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती.

शरद हिरामण मोहोळ (वय 38), विश्वास बाजीराव मनेरे (वय 37), मनोज चंद्रकांत पवार (वय 42), स्वप्नील अरुण नाईक (वय 35) आणि योगेश भालचंद्र (वय 40) अशी त्या पाच जणांची नावे आहेत. अन्य बारा जणांवर या प्रकरणात गुन्हा दाखल आहे. बचाव पक्षाच्या वतीने ॲड. अमोल ढमाले, ॲड. मनीष पाडेकर, ॲड. संजय साळुंखे आणि ॲड. अशिनी खंडाळे यांनी बाजू मांडली.

मोहोळ याला एका संघटनेच्या पुरस्काराच्या कार्यक्रमासाठी 26 जानेवारी रोजी बोलविण्यात आले होते. त्या कार्यक्रमास मोहोळ व त्याचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने तेथे आले होते. तेव्हा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच करोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोणत्याही नियमांचे पालन करण्यात आले नाही.

आरोपींनी आरडाओरडा करून दहशत निर्माण केली. त्यामुळे नागरिक घाबरून पळाले होते. त्यामुळे आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. सरकारच्या वतीने सरकारी वकील ज्ञानेश्‍वर मोरे यांनी युक्तिवाद केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.