पिंपरी, दि. 21 – नवी सांगवी जिल्हा रुग्णालयात नुकतेच महिला रुग्णांना रात्रीचे जेवण दिले जात नसल्याची घटना उघडकीस आली. याबाबत दैनिक प्रभात ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. रुग्णालयातील परिचारिका, कर्मचारी आणि पर्यवेक्षकांसह जेवण पुरवठा करणाऱ्यांना नोटीस बजाविण्यात आल्या आहेत. घडलेल्या घटनेबाबत 48 तासांत खुलासा करण्याची सूचना देखील करण्यात आली आहे. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ली यांनी दिला आहे.
जिल्हा रुग्णालयातील महिला वॉर्डमध्ये दाखल असलेल्या महिला रुग्णांना कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार वागणुकीमुळे उपाशी राहण्याची वेळ आली होती. रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील वॉर्डमध्ये अनेक रुग्ण रात्री उशिरापर्यंत जेवणासाठी थांबले होते. नियमानुसार रुग्णांना रात्रीचे जेवण 7 वाजता मिळणे आवश्यक आहे. तरीही महिला वैद्यकीय वॉर्ड क्रमांक 101 मध्ये दाखल झालेल्या रुग्णांना रात्रीचे जेवण रात्री साडे वाजता मिळाले. त्या बाबत नातेवाईकांनी संताप व्यक्त केला होता. ही गंभीर बाब रुग्णालय प्रशासनासमोर आल्यानंतर प्रशासनाने कारवाईचे पाऊल उचलले आहे.
दिलेल्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले की, रुग्णालयाच्या प्रथमदर्शनी तुम्ही कर्तव्यात निष्काळजी असल्याचे आढळले आहे. हा तुमच्यासाठी कडक इशारा आहे. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये. 48 तासांच्या आत स्पष्टीकरण द्या, असे न केल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे नोटीसमध्ये नमूद केले आहे.