पिंपरी, दि. 21 – आईच्या निधनाचा मानसिक धक्का बसलेल्या तरुणाने अन्नपाणी सोडून स्वतःला खोलीत कोंडून घेतले. अशक्तपणा आलेल्या तरुणाला दरवाजाची कडीही उघडता येत नव्हती. अग्निशामक दलाने डोअर ब्रेकरच्या सहाय्याने दरवाजा उघडून अवघ्या काही मिनिटांमध्ये त्याची सुटका केली. ही घटना सोमवारी (दि. 21) दुपारी किवळे गावठाण येथे घडली.
राजू निकाळजे (वय 40, रा. ज्ञानदीप कॉलनी, मनपा शाळामागे, किवळे गावठाण) असे सुटका करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. अग्निशामक दलाचे जवान अनिल माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक तरुण घरामध्ये गेल्या 15 दिवसापासून दरवाजा बंद करून बसला आहे, अशी वर्दी सोमवारी दुपारी 4.05 वाजता अग्निशामक दलास मिळाली. त्यानुसार प्राधिकरण अग्निशामक उपकेंद्राचे काशिनाथ ठाकरे (सिनियर फायरमन), अनिल माने (फायरमन), दिनेश पाटसकर (वाहन चालक) ऋषिकेश आव्हाड (ट्रेनि फायरमन), रोहित मांजरे (ट्रेनि फायरमन), सुशील पाटील (ट्रेनि फायरमन) यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी डोर ब्रेकरच्या सहाय्याने अवघ्या काही मिनिटांमध्ये दरवाजा तोडला.
काही दिवसांपूर्वी राजू निकाळजे यांच्या आईचे निधन झाले. याचा मानसिक धक्का राजू यांना बसला. आईच्या आठवणी त्यांना व्याकुळ करीत असल्याने त्यांनी घराचा दरवाजा लावून घेत स्वतःला कोंडून घेतले. या 15 दिवसांच्या कालावधीत त्यांच्या पोटात अन्नाचा कणही गेला नाही. यामुळे त्यांना अशक्तपणा आला होता. आसपासच्या नागरिकांनी त्यांना दरवाजा उघडण्यासाठी वेळोवेळी आवाज दिला. त्यांनी आतून प्रतिसाद दिला मात्र दरवाजा उघडला नाही. अखेर 15 दिवस झाल्यावर आसपासच्या नागरिकांनी त्यांना दरवाजा उघडण्यासाठी आवाज दिला. मात्र अशक्तपणामुळे त्यांना दरवाजा उघडता येत नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे आसपासच्या नागरिकांनी अग्निशामक दलास वर्दी दिल्यावर त्या तरुणाची सुटका करण्यात आली.