अहवालास टाळाटाळ केल्याप्रकरणी शिक्षणाधिकारी, लेखाधिकाऱ्यांना नोटीस
पुणे – शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत अखर्चित निधी, चालू वर्षीतील उपलब्ध निधी, खर्च व शिल्लक निधीची माहिती पडताळणी समितीकडे सादर करण्यास सतत टाळाटाळ केल्याबद्दल प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी पुणे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनील कुऱ्हाडे, लेखाधिकारी बी. व्ही. जाधव यांना कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे. प्रत्यक्ष उपस्थित राहून मुदतीत व समाधानकारक खुलासा सादर न केल्यास नियमाप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येणार आहे, असा इशाराही देण्यात आलेला आहे.
शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत केंद्र व राज्य शासनाकडून प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या स्तरावरुन शाळांना निधी उपलब्ध करुन देण्यात येतो. विद्यार्थी संख्येनुसार निधी पुरविण्यात येत असतो. या निधीची पडताळणी करुन त्याचे अहवाल शासनाकडे सादर करणे बंधनकारक असते. निधीचा विनियोग, जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखाधिकारी यांच्या बॅंक खात्यातील योजनेचा शिल्लक निधी व चालू वर्षी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या निधीचा विनियोग याची पडताळणी करणे आवश्यक आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये उपललब्ध निधीच्या विनियोगाचे नियोजन करण्यासाठी माहिती मागविणे व जिल्हा स्तरावरील मूळ अभिलेख्यांची पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
नोटीसमध्ये काय म्हटलंय…?
शिक्षणाधिकारी व लेखाधिकारी नियोजित तारखेस अभिलेखे व माहिती घेऊन पडताळणी समितीसमोर उपस्थित राहिले नसल्याची बाब गंभीर आहे. वरिष्ठ कार्यालयाने दिलेल्या निर्देशाचे पालन केले जात नाही व प्रशासकीय माहिती पडताळणी समितीस उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) अधिनियम 1979 मधील तरतुदीनुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे प्रस्तावित का करण्यात येऊ नयेत, याचा वस्तुस्थितीदर्शक पुराव्यांसह खुलासा दि. 18 फेब्रुवारी रोजी समक्ष उपस्थित राहून सादर करावा, असे प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी कारणे दाखवा नोटीसमध्ये नमूद केले आहे.