इंदापूर तालुक्यातील शेतकरी संतापले : आमदार भरणेंकडे साकडे
रेडा – इंदापूर तालुक्यातील जवळपास 450 ते 500 शेतकऱ्यांनी शेततळ्यासाठी ऑनलाइन अर्ज करून पूर्व सहमती घेतलेली आहे. या शेतकरी लाभार्थ्यांना खोदकाम पूर्ण केल्यामुळे कृषी विभागाने बिल अदा केले आहे, असे असताना देखील चालू आर्थिक वर्षामध्ये ही बिले नाहीत म्हणून अनुदान रद्दच्या नोटिसा शेतकऱ्यांना संबंधित विभागाने बजावल्या आहेत. त्यामुळे शेतकरी संतापले आहेत.
दरम्यान, शेतकऱ्यांचे अस्तरीकरणाचे अनुदान तत्काळ मिळवून द्यावे, असे लेखी निवेदन शेतकऱ्यांच्या वतीने इंदापूर तालुका राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अतुल झगडे व राष्ट्रवादीचे प्रसिद्धी प्रमुख वसंतराव आरडे यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, लाभार्थी शेतकऱ्यांनी अस्तरीकरणाचे काम डिसेंबर 2018 ते मार्च 2019 मध्ये पूर्ण केले आहे; परंतु दि. 21 डिसेंबरदिवशी संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी विभागाने बोलावून घेतले. नियमानुसार या आर्थिक वर्षातील अस्तरीकरणाची बिले जमा करण्याचे आदेश दिले. जर ही बिले यावर्षातील नसतील तर त्या लाभार्थ्यांना लाभ मिळणार नाही, अशीच नोटीस शेतकऱ्यांना धाडली आहे.
इंदापूर तालुक्यात अस्तरीकरणाची कामे ही दुष्काळी परिस्थितीमुळे 2018-19 या वेळेत पूर्ण झाले आहेत. त्यामुळे अस्तरीकरणाची बिले ग्राह्य धरली जात नाहीत. जी रक्कम मिळणार आहे. ती रक्कम देखील कृषी विभागाकडे शिलकीत आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांचे रखडलेले अस्तरीकरणाचे अनुदान देण्यात यावे, अशीही मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, इंदापूर तालुका युवक राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष सचिन राव सपकाळ, युवक नेते तात्यासाहेब वडापुरे, तानाजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.