Pune : शिवाजीनगर न्यायालय पुन्हा एका सत्रात

- करोना पॉझिटीव्ह रेट वाढल्याचा परिणाम - सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत सुरू राहणार कामकाज

पुणे – पूर्ण वेळ सुरू झालेले शिवाजीनगर न्यायालय अवघ्या आठ दिवसात पुन्हा एका सत्रात सुरू झाले आहे. शहरातील करोनाचा संसर्ग (पॉझिटीव्ह रेट) वाढल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. उद्यापासून (बुधवार दि. 23) न्यायालय सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत सुरू राहणार आहे. न्यायालय पुन्हा एक सत्रात सुरू झाल्याने वकिलांनी नाराजी व्यक्त केली आहे.

करोनाची दुसरी लाट आल्याने मार्च महिन्यापासून न्यायालय एका सत्रात सुरू होते. त्यानंतर 15 जूनपासून पुर्णवेळ सुरू झाले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार करोना पॉझिटीव्ह रेट पाचच्या आत असल्यास न्यायालय पूर्णवेळ सुरू राहणर आहे. मात्र, मागील काही दिवसात करोनाचा पॉझिटीव्ह रेट वाढला आहे. तो पाचच्या पुढे गेला आहे. त्यामुळे शहर लेव्हल दोनला गेले आहे. याबाबतची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. त्यानंतर पुन्हा न्यायालय एका सत्रात सुरू झाले आहे.

केवळ पाचच्या आत पॉझिटीव्ह रेट असलेल्या म्हणजे पहिल्या लेव्हलच्या शहरातच न्यायालय पूर्ण वेळ सुरू राहणार आहेत. त्यामुळे न्यायालयीन सुनावण्यांना गती मिळेल, ही वकील, पक्षकारांची अपेक्षा फोल ठरली आहे. दरम्यान यास पुणे बार असोसिएशने आक्षेप नोंदविला असल्याचे अध्यक्ष ऍड. सतीश मुळीक यांनी सांगितले.

करोनाच्या पॉझिटीव्ह रेटमध्ये दररोज बदल होत असतो. तो सारखेच पाचपेक्षा कमी किंवा जास्त असण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे लगेच न्यायालय एका सत्रात करणे योग्य नाही, असा आक्षेप प्रमुख जिहा न्यायाधीश नीरज धोटे यांच्याकडे पुणे बार असोसिएशनने नोंदविला आहे.

मात्र, उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार न्यायालय एकवेळ सुरू ठेवण्याचा निर्णय धोटे यांनी घेतला आहे. करोना परिस्थितीत वकील काळजी घेऊन काम करत आहेत. पुन्हा करोना पॉझिटीव्ह रेट कमी झाला आहे. त्यामुळे काही दिवसांसाठी न्यायालय एकवेळ एका सत्रात सुरू ठेवणे योग्य वाटत नसल्याचे ते म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.