सेऊल, (दक्षिण कोरिया) – उत्तर कोरियाने आज पुन्हा एकदा लांब पल्ल्याच्या आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. क्षेपणास्त्र चाचण्यांची मालिका सुरू ठेवताना गेल्या ५ महिन्यातील ही पहिलीच लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी उत्तर कोरियाने घेतली आहे.
या क्षेपणास्त्राने १ हजार किलोमीटरचा प्रवास केला आणि नंतर ते कोरिया द्विपसमूह आणि जपान दरम्यानच्या समुद्रात कोसळले. शेजारच्या देशांमध्ये पडू नये यासाठी या क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण उंचीवरून करण्यात आले होते. क्षेपणास्त्राने ६ हजार किलोमीटर पर्यंत उंची गाठली होती, असे जपानच्या संरक्षण संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
ही चाचणी घन इंधनाच्या क्षेपणास्त्राची होती, असे दक्षिण कोरियाने म्हटले आहे. असाच घन इंधनाच्या आधारे उत्तर कोरियाने हवॉसॉंग-१८ इंटर कॉन्टिनेन्टल बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्यावेळीही घेतली होती. अशा तंत्रज्ञानाचे क्षेपणास्त्र शोधणे द्रव इंधनाच्या क्षेपणास्त्राला शोधणे अधिक अवघड असते.
हवॉसॉंग-१८ हे आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हे आण्विक श्कींमधील सर्वात ताकदवान क्षेपणास्त्र असल्याचे उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांनी पूर्वीच म्हटले होते. जुलै महिन्यात आशाच क्षेपणास्त्राची चाचणी उत्तर कोरियाने घेतली होती. ते थेट अमेरिकेच्या भूमीवर मारा करू शकेल, असा अंदाज व्यक्त केला गेला होता.
उत्तर कोरियाच्या या क्षेपणास्त्र चाचणीनंतर अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवन यांनी दक्षिण कोरिया आणि जपानच्या रा,ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी चर्चा केली. ही चाचणी म्हणजे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांचे उल्लंघन असल्याचे त्यांनी म्हटले आहे.